Sun, Apr 21, 2019 01:52होमपेज › Aurangabad › आयुष्याला कंटाळलो म्हणत रेल्वेसमोर उडी

आयुष्याला कंटाळलो म्हणत रेल्वेसमोर उडी

Published On: Apr 28 2018 1:52AM | Last Updated: Apr 28 2018 1:43AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

गेल्या दोन महिन्यांपासून कोणाशी बोलावेसे वाटत नाही. आयुष्याला कंटाळलो असून, खूप तणावात का आहे, हे मलाही समजत नाही असे म्हणत एका बेरोजगार तरुणाने रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली आहे. ही घटना गुरुवारी मध्यरात्रीनंतर म्हाडा कॉलनीतील रेल्वेपटरीजवळ उघडकीस आली आहे. ऋषीकेश दीपक कुडे (22, रा. परदेशी टॉवर, शहानूरवाडी) असे आत्महत्या करणार्‍या तरुणाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्रीनंतर अज्ञात व्यक्‍तीने पोलिस नियंत्रण कक्षास, जवाहर कॉलनी ठाण्याच्या हद्दीत असलेल्या म्हाडा कॉलनीजवळच्या रेल्वेपटरीवर एक तरुण गंभीर जखमी अवस्थेत पडलेला असल्याची माहिती दिली. माहिती मिळताच जवाहरनगर पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार दत्तात्रय बोटके व त्यांचे सहकारी टु मोबाइल व्हॅन घेऊन घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी रेल्वेपटरीवर पडलेल्या तरुणास घाटी रुग्णालयात आणले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. पोलिसांनी तरुणाची झडती घेतली असता त्याच्या खिशात मोबाइल व एक चिट्टी सापडली. पोलिसांनी नातेवाइकांना फोन करून घाटीत बोलविले असता तो ऋषीकेश कुडे असल्याचे त्याच्या भावाने ओळखले.  

ऋषीकेशचे बारावीपर्यत शिक्षण झालेले आहे. त्यानंतर त्याने नोकरी करण्याचा निर्णय घेतला होता. अनेक कंपन्यांमध्ये शोधून देखील त्याला काम मिळत नसल्याने तो निराश होता. तसेच काही दिवसांपासून तो कोणाशी जास्त न बोलता सतत मोबाइलमध्ये गुंतलेला होता. त्यातूनच त्याने आत्महत्या केल्याची शक्यता नातेवाइकांनी व्यक्‍त केली आहे. त्याच्या पश्‍चात आई, वडील, एक भाऊ व बहीण आहे. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहायक फौजदार बोटके घटनेचा पुढील तपास करीत आहेत.