Tue, Apr 23, 2019 13:56होमपेज › Aurangabad › जानेवारीपासून राज्यात व्याघ्र गणना

जानेवारीपासून राज्यात व्याघ्र गणना

Published On: Dec 11 2017 1:27AM | Last Updated: Dec 11 2017 12:49AM

बुकमार्क करा

औरंगाबाद : जितेंद्र विसपुते

आपल्या पावलांनी जमीन जिंकत जाणारा प्राणी म्हणून वाघाची ओळख आहे. हा आपला राष्ट्रीय प्राणीदेखील आहे. राज्यातील वाघांच्या अधिवास क्षेत्रात काय बदल झाला आहे? संवर्धन आणि विकासाकरिता कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत? तसेच वाघांची नेमकी आकडेवारी किती, यासाठी जानेवारीपासून राज्यासह देशभरात व्याघ्र गणना केली जाणार आहे.

ही व्याघ्र गणना राज्यातील व्याघ्र संवर्धन प्रकल्प, अभयारण्य तसेच संचार प्रकल्पात केली जाईल. याबाबत अधिकार्‍यांच्या एका तुकडीला नुकतेच पेंच अभयारण्यात प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे अधिकारी आपापल्या विभागत जाऊन तेथील अधिकारी व कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देतील. यानंतर गणना केली जाईल. देशभरात एकाच तारखेपासून गणना होणार आहे. चार वषार्र्ंनंतर राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणकडून (एनटीसीए) ही गणना केली जाते. मागील गणना 2014 मध्ये झाली होती. महाराष्ट्रासह देशभरात दोन टप्प्यांत गणना केली जाणार असून, पहिल्या टप्प्यात ट्रॅपिंग कॅमेर्‍यांचा वापर केला जाणार आहे. या कॅमेर्‍यात टिपल्या जाणार्‍या वाघांच्या छायाचित्रातून आकडेवारी निश्‍चित होईल.

दुसर्‍या टप्प्यात पाच दिवस गणना केली जाईल. यात वाघांच्या पायांचे ठसे, झालेल्या शिकारीचा प्रकार तसेच विष्ठा याचा अभ्यास करून आकडेवारी संकलित केली जाईल. यानंतर सर्व माहिती राज्यनिहाय एनटीसीएकडे पाठविली जाईल. या गणनेत वनविभाग, वन्यजीव विभाग, एनटीसीए, डब्ल्यूआयआय, एनजीओ आदींचा सहभाग असणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशात गणनेला सुरुवात झाली आहे.

सद्यस्थितीला भारतात प्रोजेक्ट टायगरअंतर्गत 50 टायगर रिझर्व्ह जाहीर करण्यात आले आहेत. यात महाराष्ट्रातील मेळघाट टायगर रिझर्व्ह, पेंच टायगर रिझर्व्ह, ताडोबा अंधारी टायगर प्रोजेक्ट, नागिझरा नवेगाव टायगर रिझर्व्ह, बोर टायगर रिझर्व्ह आणि सह्याद्री टायगर रिझर्व्ह प्रोजेक्टचा समावेश आहे.