Tue, Jul 23, 2019 06:18होमपेज › Aurangabad › ट्रकने चौघांना चिरडले, तीन ठार

ट्रकने चौघांना चिरडले, तीन ठार

Published On: Dec 23 2017 2:02AM | Last Updated: Dec 23 2017 1:41AM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

औरंगाबादहून दोन दुचाकींनी लासूरगावकडे (ता. वैजापूर) जाणार्‍या चौघांना मुंबई महामार्गावर सिंधी सिरसगावजवळ अज्ञात ट्रकने चिरडले. यात तिघे ठार, तर एक जखमी आहे. हा अपघात शुक्रवारी (दि. 22) रात्री 9 वाजेच्या सुमारास घडला. पोलिसांच्या वाहनातील जीपीएसचा तांत्रिक बिघाड झाल्याने जखमींना वेळेत मदत मिळाली नाही. त्यामुळे रात्री 11 वाजेपर्यंत त्यांना दवाखान्यातही आणण्यात आले नव्हते. 

साहेबराव चांगदेव शेजूळ (52), मनोहर अंबादास काळे (51) आणि बाळू दामूजी नेटके (51, रा. लासूरगाव) अशी मयतांची नावे आहेत. तसेच नवनाथ रामभाऊ नेटके हे जखमी आहेत. याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे चौघे दोन वेगवेगळ्या दुचाकींवरून औरंगाबादहून लासूरगावकडे जात होते. त्यात बाळू नेटके आणि नवनाथ नेटके हे एका दुचाकीवर होते, तर साहेबराव शेजूळ आणि मनोहर काळे हे दुसर्‍या दुचाकीवर (क्र. एमएच 20 बीजी 157) होते. त्यांच्या गाड्या मुंबई महामार्गावरील सिंधी सिरसगावजवळ आल्या तेव्हा रात्रीचे नऊ वाजलेले होते.

त्याच वेळी समोरून येणार्‍या भरधाव ट्रकने दोन्ही दुचाकींना चिरडले. यात साहेबराव शेजूळ, मनोहर काळे आणि बाळू नेटके ठार झाले, तर नवनाथ नेटके जखमी झाले. अपघाताची माहिती शहर पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मिळाल्यावर ते दौलताबाद टू मोबाइल वाहनाशी संपर्क करीत होते, परंतु संपर्क न झाल्यामुळे जखमींना वेळेत मदत मिळाली नाही.

त्यानंतर एमआयडीसी वाळूज ठाण्याच्या टू मोबाइलशी संपर्क साधून घटनास्थळी पाठविण्यात आले. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर साबळे यांनीही जखमींना मदतीसाठी धाव घेतली. दरम्यान, रात्री उशिरा दौलताबाद ठाण्याच्या टू मोबाइलमधून हवालदार ज्ञानेश्‍वर साळवे, ईश्‍वर पवार, विकास करांजे आणि जारवाल यांनी एक मृतदेह घाटीत आणला.