Mon, Mar 25, 2019 05:03
    ब्रेकिंग    होमपेज › Aurangabad › साडेतीन हजार बालके कुपोषित

साडेतीन हजार बालके कुपोषित

Published On: Feb 05 2018 1:29AM | Last Updated: Feb 05 2018 1:29AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

जिल्ह्यात तब्बल तीन हजार चारशे चार बालके कुपोषित असल्याचे समोर आले आहे. महिला व बाल कल्याण विभागाने गेल्या महिन्यात केलेल्या सर्व्हेतून ही बाब स्पष्ट झाली आहे. तसेच 15 हजार 339 बालकांचे वजनही सरासरीपेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. काही केल्या शासनास कुपोषित बालकांचे प्रमाण कमी करण्यात यश येत नसल्याचे यावरून दिसून येते.

कुपोषण रोखण्यासाठी शासनातर्फे विविध योजना आणि मोहिमा राबविल्या जातात. अंगणवाडी, शाळांतून मुलांना पोषण आहाराचे वाटपही केले जाते. मात्र, कुपोषण नियंत्रणात आणण्यात यश मिळताना दिसत नाही. जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाने अंगणवाडी सेविकांच्या मदतीने गेल्या महिन्यात जिल्ह्यातील शून्य ते पाच वयोगटातील बालकांचे वजन केले. या वयोगटातील जिल्ह्यात दोन लाख 35 हजार 489 बालके आहेत. यापैकी दोन लाख 24 हजार 533 बालकांचे वजन करण्यात आले असून यापैकी 15 हजार 339 मुलांचे वजन सरासरीपेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आले, तर तीन हजार 404 बालके कुपोषित आढळली.