Wed, Apr 24, 2019 21:32होमपेज › Aurangabad › पोलिस खाते भाजप कार्यकर्त्यांच्या दिमतीला

पोलिस खाते भाजप कार्यकर्त्यांच्या दिमतीला

Published On: Apr 06 2018 2:19AM | Last Updated: Apr 06 2018 1:37AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाने यंदा वर्धापनदिनी मुंबईत मेळावा आयोजित केला असून निवडणुका जवळ आल्यामुळे मोठे शक्‍तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. या मेळाव्यासाठी विदर्भ आणि मराठवाड्यातील कार्यकर्त्यांना जाता यावे म्हणून गुरुवारी पाच विशेष रेल्वे सोडण्यात आल्या. या कार्यकर्त्याची विशेष काळजी घेतली जात असून मुंबईला मेळाव्यासाठी जाणार्‍या सर्व ‘विशेष रेल्वे’ला ग्रामीण आणि शहर पोलिसांनी तगडा बंदोबस्त पुरविला. पोलिस खाते भाजप कार्यकर्त्यांच्या दिमतीला रेल्वे ट्रॅकवर तैनात करण्यात आले होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, 4 एप्रिलपासून शेंद्रा येथे मांगीरबाबा यात्रोत्सव सुरू आहे. गुरुवारी, 5 एप्रिल रोजी यात्रेचा दुसरा दिवस असल्याने भाविकांनी परतीचा प्रवास सुरू केला. दरम्यान, शेंद्रा येथेच रेल्वे थांबावी यासाठी काही लोकांनी रेल्वेवर दगडफेक केली. 

हा प्रकार चिकलठाणा आणि करमाड पोलिसांना समजताच त्यांनी बंदोबस्त तैनात केला. दरम्यान, याच मार्गावरून भाजप मेळाव्यासाठी पाच विशेष रेल्वे जाणार होत्या. विदर्भ आणि मराठवाड्यातील कार्यकर्ते या रेल्वेतून प्रवास करीत होते. त्या कार्यकर्त्यांचा प्रवास सुकर व्हावा म्हणून ग्रामीणसह शहर पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली. करमाड, शेंद्रा, चिकलठाणा, मुकुंदवाडी, मुख्य रेल्वे स्टेशन, दौलताबाद, लासूर स्टेशन आदी ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. 

शेंद्रा येथे रेल्वे थांबविण्यासाठी काही लोकांनी दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर रेल्वे ट्रॅकवर बंदोबस्त लावण्यात आला. दरम्यान, पाच विशेष रेल्वे जाणार असल्याची माहिती मिळाली. त्या रेल्वेंनाही बंदोबस्त देण्यात आला.  - डॉ. आरती सिंह, पोलिस अधीक्षक, ग्रामीण

शेंद्रा येथे दगडफेक झाल्याचे समजल्यावर भाजप मेळाव्यासाठी जाणार्‍या विशेष रेल्वेवरही काही समाजविघातक कृत्य करणारे लोक दगडफेक करण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्यामुळे लगेचच संपूर्ण रेल्वे ट्रॅकवर विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला. आम्ही स्वतः या बंदोबस्तावर लक्ष ठेवून आहोत. - राहुल श्रीरामे, उपायुक्‍त, परिमंडळ