Sun, Mar 24, 2019 04:39होमपेज › Aurangabad › साडेतेरा लाख रोपांची लागवड

साडेतेरा लाख रोपांची लागवड

Published On: Jul 03 2018 1:50AM | Last Updated: Jul 03 2018 12:12AMऔरंगाबाद : जितेंद्र विसपुते

वनाच्छादित क्षेत्रात वाढ व्हावी या उद्देशाने राज्यभरात मागील पाच वर्षांपासून शतकोटी वृक्षारोपण मोहीम राबविली जात आहे. यंदा विविध विभागांच्या अंतर्गत 1 ते 31 जुलै दरम्यान मराठवाड्यात वृक्षारोपण केले जाणार असून या मोहिमेंतर्गत पहिल्याच दिवशी (1 जुलै) मराठवाड्यात 13 लाख, 32 हजार, 698 रोपांची लागवड करण्यात आली. 

13 कोटी वृक्षलागवड मोहिमेंतर्गत मराठवाड्याला यंदा 2 कोटी 99 लाख रोपे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यादृष्टीने वन विभागाकडून एप्रिल महिन्यांपासून नियोजन सुरू झाले. वनमंत्र्यांसह वन सचिव यांनी बैठका घेऊन वृक्षारोपणाचा अधिकार्‍यांकडून आढावा घेतला. वन विभागाकडून 3 कोटी 37 लक्ष खड्डे खोदण्यात आले. नियोजनानुसार 1 जुलैपासून वृक्षारोपणाला सुरुवात करण्यात आली.

विविध यंत्रणांकडून 1 जुलै रोजी (रविवारी) मराठवाड्यात 13 लाख 32 हजार रोपांची लागवड करण्यात आली. सर्वाधिक रोपांची लागवड लातूर जिल्ह्यात झाली असून आकडा 3 लाख 38 हजार इतका आहे. 31 जुलैपर्यंत विविध यंत्रणांमार्फत मराठवाड्यात वृक्षारोपण करून उद्दिष्ट पूर्ण केले जाणार आहे. 

पहिल्याच दिवशी औरंगाबाद विभागाने 2 टक्के, तर जालना विभागाने 1 टक्के लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केेले आहे. बीड विभागाने 8, हिंगोली 4, नांदेड 1, उस्मानाबाद 6, लातूर 8 आणि परभणी विभागाने 4 टक्के लावडीचे उद्दिष्ट पूर्ण केलेले आहे. 

जीएपीएसद्वारे मॉनेटरिंग...

दररोज झालेल्या वृक्षारोपणाची माहिती वन विभागाकडून शासनाकडे ऑनलाईन भरली जात आहे. ज्या भागात वृक्षारोपण होणार आहे त्या भागाचे जीपीएस रीडिंग यापूर्वीच वन विभागाकडून घेण्यात आलेले आहे. वृक्षारोपण मोहीम आटोपल्यानंतर त्या भागांचे पुन्हा जीपीएसचे रीडिंग वन विभागाकडून घेतले जाईल. यानंतर काही महिन्यांनंतर सुरुवातीचे आणि वृक्षारोपणानंतर घेतलेले जीपीएस रीडिंग टॅली केले जाईल. यावरून वृक्षारोपण किती, कसे आणि कुठे झाले याची माहिती मिळणार आहे. या आधारे वृक्षारोपण मोहिमेचे मॉनेटरिंग होणार आहे.