Mon, Jan 21, 2019 03:27होमपेज › Aurangabad › शिक्षणमंत्री तावडेंचे आश्वासन हवेतच

शिक्षणमंत्री तावडेंचे आश्वासन हवेतच

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी 

फुलंब्री तालुक्यातील धामणगावातील इयत्ता आठवीपर्यंत असणार्‍या उर्दू जिल्हा परिषद शाळेला पंधरा दिवसांत दहावीपर्यंतची मान्यता देणार अशी घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली होती, मात्र या घोषणेचा त्यांना विसर पडला. त्यामुळे धामणगावाला दहावीचा वर्ग कधी सुरू होणार हे अद्याप निश्‍चित सांगता येत नाही. 

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी १० मार्च रोजी उर्दू शिक्षण वारीच्या कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिक्षकांशी संवाद साधला होता. त्यावेळी हे आश्‍वासन दिले होते, परंतु आता सतरा दिवस उलटले आहेत, तरी या संदर्भात कोणतीही प्रक्रिया करण्यात आलेली नाही. शिक्षणवारीत आलेल्या ग्रामीण भागातील शिक्षकांनी अनेक समस्या मांडल्या. 

फुलंब्री तालुक्यातील धामणगावातील जि.प. उर्दू शाळा आठवीपर्यंतच आहे. त्यामुळे गावातील मुलींना पालक शाळेत पाठवत नाहीत. परिणामी, त्यांचे कमी वयात विवाह होत आहेत. तसेच शाळेच्या सर्व्हेसाठी घरोघरी गेले असता पालक तुमची शाळा केवळ आठवीपर्यंत आहे, आम्ही मुलींना पाठवणार नाहीत असे ऐकवतात. शाळेत दहावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी अनेकदा सरपंचाकडे पत्र दिले, मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. 

मुलींच्या हितासाठी तरी आमची शाळा दहावीपर्यंत करा, अशी मागणी शाळेच्या शिक्षिका शेख सादिया अलताफ यांनी शिक्षणमंत्री तावडे यांच्याकडे केली होती. त्यावर तावडे यांनी पंधरा दिवसांत वर्ग सुरू करण्याचे आश्‍वासन दिले होते.

आमदारही भेटेनात, शिक्षणमंत्री तर दूरच..
या विषयासंदर्भातील निवेदन शिक्षणमंत्र्यांच्या सांगण्यावरून आमदार अतुल सावे यांच्याकडे देण्यात आले. मात्र यासाठीचा प्रस्ताव शाळा व गावातून येणे अपेक्षित होते. शाळेतील शिक्षकांना गावकर्‍यांच्या संमतीने शाळा दहावीपर्यंत सुरू करावी यासंदर्भाचा प्रस्ताव तयार केला. सदर प्रस्ताव देण्यासाठी या शिक्षकांनी आमदार सावेंकडे तीन ते चार वेळा चकरा मारल्या, पण ‘आमदार साहेब अधिवेशनास गेले आहेत.. दौर्‍यावर आहेत’ अशीच उत्तरे शिक्षकांना मिळाली. आमदारांची भेटच न झाल्याने पुढचे सर्व घोडे अडले आहे. शिवाय आमदारांचीच भेट दुर्लभ झाल्याने शिक्षणमंत्री कधी भेटणार व आपल्या गावांत दहावीचा वर्ग कधी सुरू होणार, हा प्रश्‍न ग्रामस्थांना पडला आहे.

Tags :  education, vinod tawde, minister ,assurance


  •