Tue, Apr 23, 2019 23:33होमपेज › Aurangabad › ‘मुख्यमंत्र्यांशी चर्चेला जाणार्‍यांचा मराठा क्रांती मोर्चाशी संबंध नाही’

‘मुख्यमंत्र्यांशी चर्चेला जाणार्‍यांचा मराठा क्रांती मोर्चाशी संबंध नाही’

Published On: Aug 05 2018 1:39AM | Last Updated: Aug 06 2018 1:51AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

मराठा आरक्षण आंदोलन आणि मागण्यांसंदर्भात राज्य शासन आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चेला कोणीही जाणार नाही. जे कोणी जातील ती त्यांची वैयक्‍तिक बाब असेल. त्याचा मराठा क्रांती मोर्चाशी कोणताही संबंध नसेल, असे मराठा क्रांती मोर्चाने पत्रक काढून जाहीर केले आहे.

मराठा क्रांती मोर्चाची शनिवारी (दि. 4) बैठक पार पडली. यावेळी मागण्या आणि प्रश्‍न सर्वांनाच माहीत असल्याने मुख्यमंत्र्यांशी चर्चेला न जाण्याचा निर्णय घेण्यात आला. चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचा मुद्दा समोर आला. शिवाय एक ऑडिओ क्‍लिपही व्हायरल झाली असून समाजात तीव्र नाराजी पसरली आहे.  या क्‍लिपचा आणि आंदोलनाचा अर्थाअर्थी संबंध नसून ती समन्वय समितीची अधिकृत भूमिकाही नाही.

अशा प्रवृत्तीचा जाहीर निषेध करत संबंधित व्यक्‍तींशी मराठा क्रांती मोर्चाशी कुठलाही संबंध नसेल, असे स्पष्ट करण्यात आले. तसेच लवकर आंदोलनाची पुढील दिशा आणि आंदोलन आचारसंहितेबाबत पत्रकार परिषद घेण्यात येईल, असे सांगण्यात आले.

आज बागडे यांच्या घरासमोर ठिय्या

मराठा क्रांती मोर्चातर्फे राज्यभरात एक ऑगस्टपासून लोकप्रतिनिधींच्या घर आणि कार्यालयासमोर ठिय्या व थाळीनाद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. शुक्रवारी आ. अतुल सावे यांच्या कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन केले होते. त्यानंतर रविवारी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे समन्वयकांनी सांगितले.