Sun, Jul 21, 2019 06:24होमपेज › Aurangabad › तब्बल सहा वेळा ११ वी प्रवेश प्रक्रियेत विघ्न 

तब्बल सहा वेळा ११ वी प्रवेश प्रक्रियेत विघ्न 

Published On: Aug 27 2018 1:26AM | Last Updated: Aug 27 2018 1:14AMऔरंगाबाद ः भाग्यश्री जगताप

अकरावी प्रवेश प्रक्रिया 11 मेपासून सुरू करण्यात आली. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू करण्यात आल्याने सुरळीत पार पडेल असे वाटत होते, मात्र अतिवृष्टी, महाराष्ट्र बंद, खंडपीठाचे आदेश तसेच इतर काही कारणांमुळे सहा वेळा प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली व तीन वेळा वेळापत्रक बदलण्यात आले. तरीही 11 हजार 556 जागा अजूनही रिक्त राहिल्या आहेत. 

मनपा हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयात ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. यात 112 महाविद्यालयांचा सहभाग असून त्यातील प्रवेशक्षमता 29 हजार 405, त्यासाठी आतापर्यंत 22 हजार 395 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. केंद्रीय प्रवेशाच्या चार फेर्‍यांमध्ये 13 हजार 179 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत, तर कोट्यातून 3 हजार 694 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. चार केंद्रीय फेर्‍या व एक विशेष फेरीत असे एकूण 17 हजार 461  विद्यार्थी प्रवेशित झाले असून 11 हजार 556 जागा रिक्त राहिल्या आहेत. आता उर्वरित जागांसाठी सोमवारपासून (दि. 27) एफसीएफएस फेरी म्हणजेच प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य ही स्पॉट अ‍ॅडमिशनची फेरी होणार आहे. 

गटनिहाय ही फेरी 2 सप्टेंंबरपर्यंत चालणार आहे. गट क्र. 1 -  ज्या विद्यार्थ्यांना 80 ते 100 टक्के गुण प्राप्त झालेले असतील असे विद्यार्थी सोमवारपासून होणार्‍या फेरीसाठी पात्र असणार आहे. अ‍ॅलोकेशन झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्‍चितीसाठी मंगळवारपर्यंत (दि.28) मुदत असणार आहे. 

या कारणास्तव खोळंबले फेर्‍यांचे वेळापत्रक

पहिली ः  दि. 5 जुलैला घेण्यात आलेल्या पहिल्या फेरीत 9 हजार 688 विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळाली होती. त्याचे प्रवेश 9 जुलैपर्यंत घेणे आवश्यक होते, मात्र प्रवेश प्रक्रियेस 10 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.

दुसरी ः पहिल्या फेरीतील प्रवेश अतिवृष्टीमुळे होऊ न शकल्याने 11 जुलैपर्यंत प्रवेश घेण्यास मुदतवाढ देण्यात आली. पहिल्या फेरीत 5 हजार 772 प्रवेश झाले. विशेष म्हणजे मुदतवाढ देऊनही केवळ 150 प्रवेश झाले.

तिसरी ः 16 जुलैला जाहीर होणारी दुसरी फेरी नागपूर खंडपीठाच्या आदेशामुळे 21 जुलैवर ढकलण्यात आली. यावेळी दुसर्‍यांदा वेळापत्रक बदलण्यात आले.

चौथी ः 24 जुलैला मराठा समाजाला आरक्षण द्या, या मागणीसाठी एका युवकाने गोदावरी पात्रात घेतलेल्या जलसमाधीमुळे मराठा समाजाने महाराष्ट्र बंदची हाक दिली. त्यामुळे तिसर्‍या फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरण्यास मुदतवाढ देण्यात आली. 

पाचवी ः 26 जुलैला होणारी तिसरी फेरी नागपूर खंडपीठाच्या आदेशांचे पालन करण्यासाठी ही फेरी पुढे ढकलण्यात आली. ही फेरी 30 जुलैला घेण्यात आली. यावेळी तिसर्‍यांदा वेळापत्रक बदलण्यात आले.

सहावी ः 9 ऑगस्टला महाराष्ट्र बंदच्या हाकेमुळे महाविद्यालये बंद असल्याने प्रवेशासाठी एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली होती. विद्यार्थ्यांना 10 ऑगस्टपर्यंत प्रवेश घेण्यास मुदतवाढ दिली होती.