होमपेज › Aurangabad › सात वर्षांपासून ‘योग’ वाढविण्याचा त्यांचा वसा

सात वर्षांपासून ‘योग’ वाढविण्याचा त्यांचा वसा

Published On: Jun 21 2018 1:28AM | Last Updated: Jun 21 2018 12:59AMऔरंगाबाद : प्रताप अवचार

योग करणे हा एक दिवसाचा उत्सव नाही. योग ही साधना आहे. ती नित्यनेमाने व निष्ठेने करावी लागते, असा उद्देश घेऊन शहरातील डॉ. प्रज्ञा तल्हार, सुनंदा काथार व बाळकृष्ण खानवेलकर हे तब्बल सात वर्षांपासून विविध भागात योगाचे निःशुल्क वर्ग चालवितात. त्यांच्यामुळे आज नागरिकांमध्ये जागृती झाली असून हजारोंनी योग करून निरोगी आयुष्याचा मार्ग निवडला आहे. जागतिक योगदिनानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा.

वीस वर्षांपासून अविरत सेवा 

औरंगपुर्‍यातील सिमंत मंगल कार्यालय संस्थेच्या वतीने वीस वर्षांपासून फक्‍त महिलांसाठी ‘राणी लक्ष्मीबाई योग वर्ग’ चालतो. श्री. हर्सूलकर यांनी सुरू केलेला हा मोफत योग प्रशिक्षण वर्ग नियमितपणे सुरू आहे. सण असो अथवा उत्सव सोमवार ते शनिवार योगवर्गात कधीच खंड पडत नाही. हीच परंपरा कायम ठेवत हर्सूलकरानंतर सात वर्षांपूर्वी योगवर्गाची संपूर्ण जबाबदारी घेतली. आज परिस्थितीला शंभर महिला नित्यनेमाने योग प्रशिक्षण घेत आहेत. तर अनेक महिलांना आजारांपासून मुक्‍तता मिळाली आहे. योगाचे मोफत धडे देणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. यामुळे देशाला निरोगी व आरोग्यसंपन्न बनविण्याच्या चळवळीत आमचा खारीचा वाटा असेल, असे योगशिक्षिका सुनंदा काथार यांनी सांगितले.