Tue, Apr 23, 2019 14:10होमपेज › Aurangabad › भूमिगत गटारींचे काम नगरसेविकेने पाडले बंद

भूमिगत गटारींचे काम नगरसेविकेने पाडले बंद

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

औरंगाबाद : हर्षवर्धन हिवराळे

केंद्र सरकारकडून आलेल्या एक कोटीच्या निधीतून सुरू असलेले भूमिगत गटारींचे काम थातूरमातूर होत असल्याने संतापलेल्या कर्णपुर्‍याच्या नगरसेविका प्रतिभा काकस यांनी बंद पाडले. त्यामुळे इतर वॉर्डांमध्ये होत असलेल्या कामावरही प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. ही बाब परिषदेच्या अधिकार्‍यांच्या लक्षात आलेली असतानाही त्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

छावणी परिषदेत नेहमी उत्पन्न कमी असल्याची बोंब असते. त्यातच केंद्र सरकारने स्वच्छता अभियानासाठी परिषदेला एक कोटीचा निधी दिला आहे. या निधीतून 80 लाख रुपये खर्चून सध्या छावणीतील वॉर्डांमध्ये भूमिगत गटारींचे काम सुरू आहे. जवळपास सर्वच घरांसमोर हे काम सुरू असल्याने नागरिकांना दुर्गंधी व डासांचा त्रास सहन करावा लागत होता. विशेष म्हणजे या सर्व नाल्या पूर्वीच्या काळातील असल्याने चांगल्याच खोल आहेत. त्यातच नियमित सफाई होत नाही. या सर्व नाल्या भूमिगत करण्याचा निर्णय सहा महिन्यांपूर्वीच परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला होता.

मात्र निधीची कमतरता होती. टोल नाका चालविण्यास घेऊन एका नागपूरच्या कंपनीने ऐन वेळी चालविण्यास नकार दिल्याने परिषदेने नियमाप्रमाणे त्याने भरलेले चाळीस लाख रुपये जप्त केले होते. सातही वॉर्डांत काम करण्यासाठी 70 लाख रुपयांची गरज होती. 30 लाख रुपये खासदार चंद्रकात खैरे यांनी देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यापूर्वी 40 लाखांतून स्वच्छ वॉर्ड पुरस्कार मिळालेल्या नगरसेवक किशोर कच्छवाह यांच्या वॉर्डात काम करण्याचा आदेश स्वतः अध्यक्ष ब्रिगेडिअर अनुराग विज यांनी बैठकीत दिला होता. त्यानुसार वॉर्ड दोन व तीनमध्ये भूमिगत गटारींचे काम झालेले आहे. आता मिळालेल्या निधीतून उर्वरित वॉर्डांत काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या वॉर्ड पाच व सहामध्ये काम सुरू आहे.