Mon, Nov 19, 2018 08:23



होमपेज › Aurangabad › रेल्वेतून पडलेल्या तरुणासाठी महिलेने रेल्वे थांबवली 

रेल्वेतून पडलेल्या तरुणासाठी महिलेने रेल्वे थांबवली 

Published On: Jan 02 2018 12:58AM | Last Updated: Jan 02 2018 12:33AM

बुकमार्क करा




औरंगाबाद : प्रतिनिधी

दारात बसून प्रवास करणार्‍या तरुणाचा तोल गेल्याने तो खाली पडला. त्याला वाचवण्यासाठी त्याच डब्यातून प्रवास करणार्‍या महिलेने चेन ओढून रेल्वे थांबवली. जखमी तरुणाला तत्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली. ही घटना सोमवारी (दि. 1) दुपारी 12.30 वाजता करंजगाव रेल्वेस्टेशन दरम्यान घडली. 

मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेसने प्रवास करणारा दीपक बालासिंग राजपूत हा 25 वर्षीय तरुण दारात बसला होता. रोटेगाव-लासूरदरम्यान असलेल्या करंजगाव रेल्वेस्टेशनजवळ या तरुणाचा तोल गेल्यामुळे तो धावत्या रेल्वेतून खाली कोसळला. त्याच डब्यातून प्रवास करणार्‍या महिलेने ही घटना पाहताच तिने चेन ओढून रेल्वे थांबवली. रेल्वे थांबताच सर्वांनी त्या जखमी तरुणाला वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली. 

केवळ चेन ओढून ती महिला शांत बसली नाही, तर गाडी थांबताच रेल्वे गार्ड व आरपीएफच्या जवानांना याची माहिती दिली, परंतु गार्ड व पोलिसांनी त्या महिलेवरच राग काढला. तरीही न डगमता तिने रेल्वे पाठीमागे घेण्याबाबत दम भरला. त्या महिलेचा अवतार पाहून गार्डने सुमारे दोन किलोमीटर रेल्वे पाठीमागे घेऊन त्या जखमी तरुणाला औरंगाबादेत आणले.

दरम्यान, या घटनेची माहिती रेल्वे प्रवासी सेनेचे संतोष सोमाणी यांना कळताच त्यांनी तातडीने रेल्वे स्टेशनवर 108 रुग्णवाहिकेस बोलावून घेत जखमी तरुणाला वेळीच वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली. त्या महिलेने रेल्वे थांबवून ती मागे घेण्यास भाग पाडण्याचे धाडस दाखवले नसते तर अनर्थ घडला असता. या महिलेच्या धाडसाचे रेल्वेतील इतर प्रवाशांनी कौतुक केले.