Thu, Apr 25, 2019 21:25होमपेज › Aurangabad › चौथ्या दिवशीही शहर कचर्‍यात

चौथ्या दिवशीही शहर कचर्‍यात

Published On: Feb 20 2018 1:53AM | Last Updated: Feb 20 2018 1:30AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

शहरातील कचर्‍याच्या प्रश्‍नावर सोमवारीही तोडगा निघाला नाही. त्यामुळे शहरातील कचराकोंडी चौथ्या दिवशीही कायम राहिली. मनपाच्या वतीने सोमवारी मोजक्याच भागात कचरा संकलनाचे काम झाले. ज्या भागात कचरा साठविण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती, अशा भागात पालिकेकडून कचरा उचलला गेला नाही. त्यामुळे ठिकठिकाणी कचर्‍याचे ढीग साचले. 

नारेगावसह पंचक्रोशीतील नागरिकांनी शुक्रवारपासून कचरा डेपोच्या विरोधात बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. डेपोत कचरा आणून टाकण्यास आंदोलकांनी मज्जाव केला आहे. त्यामुळे मनपाने शुक्रवारी पैठण रोडवरील बाभुळगावात खासगी जागेत कचरा डेपो थाटण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथेही विरोध झाला.

शनिवारी मनपाने चिकलठाणा येथील स्वतःच्या मालकीच्या जागेकडे कचर्‍याच्या गाड्या वळविल्या, मात्र नागरिकांच्या विरोधामुळे मनपाला तिथूनही माघार घ्यावी लागली. त्यामुळे मनपा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी शनिवारी दुपारी नारेगाव येथील आंदोलकांची भेट घेऊन आणखी दोन महिन्यांची मुदत देण्याची विनंती केली, परंतु आंदोलकांनी त्यांची ही विनंती धुडकावून लावली. त्यामुळे चार दिवसांपासून शहरात कचराकोंडी निर्माण झाली आहे.

मनपाच्या वतीने काही वॉर्डांमध्ये उपलब्ध जागांवर कचरा जिरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. तरीदेखील रोज 30 ते 40 टक्के कचर्‍याचीच विल्हेवाट लावणे शक्य होत आहे. त्यामुळे शहरातील अनेक भागांत कचराकुंड्या ओसंडून वाहत आहेत. सोमवारीदेखील कचर्‍याच्या प्रश्‍नावर तोडगा निघाला नाही.