Wed, Apr 24, 2019 15:35होमपेज › Aurangabad › ‘आत्मा’तील घोटाळा ६६ लाख नव्हे, साडेपाच कोटींचा

‘आत्मा’तील घोटाळा ६६ लाख नव्हे, साडेपाच कोटींचा

Published On: Dec 14 2017 2:39AM | Last Updated: Dec 14 2017 2:37AM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

कृषी विभाग आणि ‘आत्मा’ कार्यालयातील घोटाळा केवळ 66 लाखांचा नसून शेतकर्‍यांच्या तब्बल साडेपाच कोटींवर भामट्यांनी डल्‍ला मारल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. यात वरिष्ठ अधिकारीही गळाला लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रकरणाच्या खोलात जाऊन तपास केला जाणार असल्याचे पोलिस आयुक्‍त यशस्वी यादव यांनी सांगितले.

उस्मानपुर्‍यातील कृषी विभागात कृषी अधीक्षकांच्या बनावट स्वाक्षर्‍या करून वीस, तर आत्मा (कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा) कार्यालयात प्रकल्प संचालकांच्या स्वाक्षर्‍या करून 46 लाख असा शेतकर्‍यांसाठी आलेला 66 लाखांचा निधी हडपला होता. सात ऑगस्ट रोजी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात यासंबंधी गुन्हा नोंदवण्यात आला आणि आत्माचा वरिष्ठ लिपिक सुनील जाधव याला अटकही केली होती.

जाधव याने जून 2012 ते जून 2017  लेखापाल पदावर असताना नोंदवही, बँक पासबुक, व्हाऊचर फाईल आदी कागदपत्रांवर फेरफार आणि बनावट स्वाक्षर्‍या करून फसवणूक केली. पोलिसांनी केलेल्या तपासात हा आकडा फुगून साडेपाच कोटींवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. घोटाळ्याची व्याप्ती लक्षात घेता हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे हस्तांतरित करावा, असे पत्र पोलिस निरीक्षक दादासाहेब शिनगारे यांनी पोलिस आयुक्‍तांना दिले होते. त्यानुसार बुधवारी (दि. 13) तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. नव्याने संबंधित आरोपी, विभागातील अधिकारी यांची चौकशी केली जाणार आहे. 

आरोपीकडून दहा गाड्या जप्‍त

कृषी विभागातील घोटाळ्यातील आरोपी जाधव याच्याकडे तब्बल दहा आलिशान गाड्या असल्याची माहिती समोर आली आहे. आर्थिक गुन्हे शाखा याअनुषंगाने पुढील तपास करणार असून गाड्या खरेदी करताना त्यांचे पैसे कोणी, कोणत्या खात्यावरून आणि कसे अदा करण्यात आले, हेही तपासले जाणार आहे. या सर्व गाड्या सध्या पोलिसांनी जप्‍त केल्या आहेत.

कृषी विभागाची चौकशी थंडबस्त्यात

तत्कालीन कृषी आयुक्‍त सुनील केंद्रेकर यांनी स्वतः औरंगाबादेत दोन दिवस ठिय्या देत घोटाळा बाहेर काढला. विभागाअंतर्गत प्रकरणाच्या एक सोडून दोन चौकशी समित्याही स्थापन करण्यात आल्या. दरम्यान, केंद्रेकरांची बदली झाली आणि चौकशी थंडावली. अद्याप एकाही समितीचा अहवाल किंवा कारवाई समोर आलेली नाही. प्रकल्प संचालक व्ही. आर. रेणापूरकर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता या प्रकरणी माहिती देण्याचे ते वारंवार टाळतात. बड्या अधिकार्‍यांचाही यात समावेश असून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशयही व्यक्‍त केला जात आहे.