Thu, Jun 27, 2019 01:33होमपेज › Aurangabad › पोलिसांच्या नावाने वसुली करणार्‍यांचा सुळसुळाट 

पोलिसांच्या नावाने वसुली करणार्‍यांचा सुळसुळाट 

Published On: Dec 07 2017 3:48PM | Last Updated: Dec 07 2017 3:38PM

बुकमार्क करा

हर्सूल : प्रतिनिधी 

शहरालगतच्या विविध गावांमध्ये पोलिसांच्या नावाने वसुली करणार्‍यांचा सुळसुळाट सुरू आहे. अवैध धंदेवाल्यांकडे पोलिसांनी दुर्लक्ष करायचे आणि खासगी वसुलीवाल्यांनी हप्ते गोळा करायचे, अशी पद्धत सुरू आहे. यामुळे शहरालगतच्या भागात दहशत निर्माण झाली आहे. 

हर्सूल व चिकलठाणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 30 ते 35 गावे शहरालगत येतात. या गावांचा हर्सूलशी संपर्क येतो.  बाजारपेठेचे गाव असल्याने हे लोक हर्सूलला जोडलेले आहेत. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे मात्र, या भागात अवैध धंदे जोरात सुरू आहेत. जळगाव रोड, जालना रोडवरून अवैध वाळू वाहतूक, दारू विक्री, मटका असे अनेक अवैध धंदे सुरू आहेत. पोलिसांचे याकडे दुर्लक्ष आहे. त्यांनी मर्जीतील काही लोकांना नेमून वसुली सुरू केली आहे. पोलिसांच्या नावाने हप्ता वसुली करणार्‍या या लोकांची या भागात दहशत निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, पोलिसांकडे तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे. 

आम्ही कोणताही झिरो पोलिस नेमलेला नाही. आमच्याकडे विशेष पोलिस अधिकारी कार्यरत आहेत. ते गैरव्यवहार करीत नाहीत. हर्सूल ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरू असतील तर थेट माझ्याशी संपर्क साधून माहिती द्या. वसुली करणार्‍यांचीही नावे सांगा. त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. मनीष कल्याणकर, पोलिस निरीक्षक, हर्सूल ठाणे 
 
तक्रार करणार्‍यांना त्रास या परिसरातील अवैध धंद्यांना आळा बसावा, म्हणून काहींनी पोलिस ठाण्यात तक्रारी केल्या; परंतु तक्रारदारांनाच या वसुलीवाल्यांनी त्रास देण्यास सुरुवात केली आहे. पोलिस मात्र त्यांना पाठिबा देत असल्याचे दिसून येते. परिणामी त्यांची दहशत वाढली आहे. हर्सूल, चिकलठाणा परिसरात अवैध दारू विक्री व जुगारात मोठी उलाढाल होते. विविध गावांत जुगाराचे डाव चालतात. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. नागरिकांनी सहायक पोलिस निरीक्षक, बीट जमादारांकडे तक्रार करूनही अवैध धंदे सुरूच आहेत.

शहरालगतच्या गावांमध्ये दारू व पत्त्यांचे अवैध धंदे जोरात सुरू आहेत. पोलिसांचे पंटर त्यांच्याकडून वसुली करतात. याची वरिष्ठांकडे किंवा बीट जमादाराकडे तक्रार केली तरी काहीही उपयोग होत नाही. या पंटरची ग्रामीण भागात दहशत आहे. त्यामुळे पोलिसांच्या नावाने हिरोगिरी करणार्‍यांवर कारवाई झाली पाहिजे. - ताराचंद काळे, संरपच