Thu, Jul 18, 2019 12:15होमपेज › Aurangabad › ‘जलयुक्त’च्या कामांवर प्रश्‍नचिन्ह

‘जलयुक्त’च्या कामांवर प्रश्‍नचिन्ह

Published On: Feb 15 2018 1:55AM | Last Updated: Feb 15 2018 1:30AMऔरंगाबाद : रवी माताडे

उन्हाळा सुरू होण्याआधीच औरंगाबादसह मराठवाड्यातील अनेक गावांना टंचाईच्या झळा बसण्यास सुरवात झाली आहे. दोन वर्षांपासून जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत कोट्यवधी रुपये खर्चून केलेल्या कामांमुळे विहिरींची पाणीपातळी वाढल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. तर भूजल विभागाने मात्र उस्मानाबाद वगळता मराठवाड्यातील इतर सातही जिल्ह्यांत पाणीपातळी घटल्याचे सांगत आहे. परिणामी, जलयुक्तमुळे झालेला फायदा केवळ कागदावरच आहे की काय, असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे. 

फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात औरंगाबाद, जालना, नांदेड जिल्ह्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. या तिन्ही जिल्ह्यांतील शेकडो गावांमध्ये सुमारे सव्वाशे टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. एप्रिल-मे महिन्यापर्यंत टंचाईग्रस्त गावांची आणि टँकरची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची चिन्हे आहेत. तर जानेवारी महिन्यात भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा विभागाने मराठवाड्यातील निरीक्षक विहिरीची तपासणी करून आकडेवारी गोळा केली. त्याचा अहवाल फेबु्रवारीत आला आहे. त्यानुसार मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 9  तालुक्यांत पाणीपातळी घटली आहे. हिंगोलीतील 5, नांदेडमधील 16, लातूर जिल्ह्यातील 5 तालुक्यांत असे एकूण 35 तालुक्यांमध्ये घट दिसून आली आहे. तसेच जालन्यातील सर्वच्या सर्व 8 तालुके, परभणीतील 9, बीडमधील 11, उस्मानाबादमधील 8 आणि लातूरमधील 5 तालुक्यांमध्ये भूजल पातळीत वाढ झाली आहे. मागील दोन वर्षांत जलयुक्तच्या कामांवर साडेनऊशे कोटी रुपये खर्च झाले आहेत. या कामांद्वारे मराठवाड्यातील दुष्काळ दूर होईल, असे चित्र जिल्हा प्रशासनाने उभे केले आहे.