Mon, Mar 25, 2019 09:08होमपेज › Aurangabad › सासरच्या लोकांनी ‘तिचा’ जगण्याचा हक्कही हिरावला

सासरच्या लोकांनी ‘तिचा’ जगण्याचा हक्कही हिरावला

Published On: Apr 10 2018 1:21AM | Last Updated: Apr 10 2018 1:21AMऔरंगाबाद : गणेश खेडकर

स्त्रियांच्या मानवी हक्कांना चिरडून टाकणारे, त्यांचा माणूस म्हणून जगण्याचा अधिकार हिरावून घेणारे एक वास्तव समोर आले आहे. पतीसोबत संसारात रममाण झालेल्या एका स्त्रीला त्याच्याकडून एचआयव्हीची लागण झाली. पतीचा या आजाराने मृत्यू झाला. त्यामुळे आधीच डोंगराएवढ्या दुःखाचा सामना करणार्‍या ‘तिचे’ जगण्याचे अवसान गळून गेले. पण, खर्‍या यातना ‘ती’ आता भोगते आहे. सासरच्यांनी ‘तिला’ घरातून हाकलून दिले. 

वैजापूर तालुक्यातील झोलेगाव येथील या प्रकारामुळे माणुसकीही थिजली, असेच म्हणावे लागेल. ‘तिचा’ आत्मसन्मान चिरडून जगण्याचा हक्क हिरावून घेतल्यामुळे तिने सासरच्या चार लोकांविरुद्ध शिऊर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही. त्यामुळे पीडितेने मानवाधिकारासाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकार्‍यांकडेही तक्रार केली. याबाबत अधिक माहिती अशी की, सुमनचा (नाव बदललेले आहे) विवाह झोलेगाव येथील बबनशी (नाव बदललेले आहे) झाला.

नवदांपत्य संसारात रममाण झाले. संसार अगदी सुखात सुरू असताना काही दिवसांतच सुमनपुढे दुःखाचा डोंगर उभा राहिला. पतीला एचआयव्हीची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे सुमन कोलमडली. बबनचा आजार शेवटच्या टप्प्यात असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यावर ‘ती’ पूर्णपणे खचून गेली. पुढे याच आजाराची लागण सुमनलाही झाल्याचे वैद्यकीय अहवालातून समोर आल्यावर ‘तिचे’ जगण्याचे अवसानच गळून गेले. मन अस्वस्थ करणारे आणि वेळप्रसंगी संताप आणणारे हे वास्तव स्वीकारून ‘ती’ जगू लागली. एकापाठोपाठ संकटे सुमला घेरत होती. दरम्यानच्या काळात बबनचे निधन झाले. त्यानंतर सासरच्या लोकांनी सुमनचा छळ करण्यास सुरुवात केली. तिला घराबाहेर काढले. तिचा पदोपदी अपमान करू लागले. 

Tags : Aurangabad, people,  Sarasars,  claimed, right, live, her, life