Sun, Apr 21, 2019 05:48होमपेज › Aurangabad › कचरा संकलनासाठी एकच एजन्सी

कचरा संकलनासाठी एकच एजन्सी

Published On: Jul 13 2018 12:47AM | Last Updated: Jul 13 2018 12:33AMऔरंगाबाद ः प्रतिनिधी 

शहरातील कचरा संकलन व वाहतूक दोन्ही कामे एकाच एजन्सीकडून करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यासंबंधीच्या नियमावलीचा प्रस्ताव बुधवारी (दि.11) सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. मात्र, त्यात काही नगरसेवकांनी एकाच एजन्सीकडून ही कामे करून घेण्यास विरोध केल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी गुरुवारी (दि.12) दिली.

घनकचरा व्यवस्थापन नियम-2016 नुसार शहरात 100 टक्के कचरा वर्गीकरण व डोअर टू डोअर कचरा संकलन होणे अपेक्षित आहे. त्यासाठी मनपा आयुक्‍त डॉ. निपुण विनायक यांनी विघटनशील, अविघटनशील आणि विघातक अशा तीन प्रकारच्या कचर्‍याची बंद वाहनांतून प्रक्रिया केंद्रापर्यंत वाहतूक करण्याच्या कामासाठी खासगी एजन्सी नियुक्‍त करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित एजन्सीला कचर्‍याच्या वजनानुसार मोबदला दिला जाणार आहे. निवासी भागात प्रतिदिन एकदा तर व्यावसायिक ठिकाणी दिवसातून दोन वेळा कचरा उचलला जाणार आहे.

यासंबंधीचा प्रस्ताव बुधवारी दि.11 सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला. हा प्रस्ताव चर्चेला आला तेव्हा एकाच एजन्सीला हे काम देऊन शहरात दुसरी रॅमकी आणू नका, अशी मागणी नगरसेवकांनी केली. मात्र, महापौर व आयुक्‍तांनी एकाच कंपनीकडून हे काम करणे अधिक चांगल्या प्रकारे होईल, असे मत व्यक्‍त केले. त्यानुसार महापौरांनी या प्रस्तावाला अंतिम मंजुरी दिली. यापूर्वीच, पालिका प्रशासनाने पदाधिकार्‍यांच्या मंजुरीने आधीच कचरा संकलन व वाहतुकीच्या कामासाठी इच्छुकांकडून प्रस्ताव मागविले आहेत. त्यावर आगामी काही दिवसांत निर्णयही होणार आहे. त्याअनुषंगानेच त्यासंदर्भातील नियमावली प्रस्तावरूपाने सभेत मंजूर करून घेण्यात आली. संकलन व वाहतुकीबरोबरच कचरा वर्गीकरणाची नागरिकांना शिस्त लावणे, रस्त्यावर कचरा टाकल्यास दंड आकारणे, अशी सर्वच कामे या एजन्सीकडून केली जाणार आहेत. मात्र, एजन्सीवर पूर्ण नियंत्रण हे पालिकेचे असेल.

मनपा मजुरांचे असेल एजन्सीवर लक्ष

प्रस्तावात आयुक्‍तांनी नमूद केले आहे की, सद्यःस्थितीत पालिकेचे सफाई मजूर, जवान, स्वच्छता निरीक्षक असे एकूण 1400 कर्मचारी घनकचरा व्यवस्थापनासाठी कार्यरत आहेत. कंत्राटदार एजन्सी सर्व काम करणार असल्याने मनपाच्या सफाई मजुरांकडून रस्त्यांची झाडाई व गटार सफाईची कामे केली जातील. तर जवान आणि स्वच्छता निरीक्षकांकडे एजन्सीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी दिली जाईल.

संबंधित एजन्सीवर सर्व जबाबदारी

कचरा संकलन व वाहतुकीसाठी लागणारे मनुष्यबळ, यंत्रसामग्री एजन्सीला स्वतःच्या खर्चातून उभी करावी लागेल. त्यासाठी 1 हजार लोकसंख्येमागे एक रिक्षा याप्रमाणे चारचाकी 300 रिक्षा, 150 हॅन्डकार्ट प्रत्येकी एका हेल्परसह, 22 हायड्रोलिक टेम्पो, 9 कॉम्पॅक्टर्स ज्यांची क्षमता 18 घनमीटर असेल, त्यासाठी एक वाहनचालक व दोन हेल्परही पुरवावे लागतील. एस्कॅवेटर व इतर आवश्यक मशिनरी ही आवश्यकतेनुसार एजन्सीला घेण्यास मुभा देण्यात आली आहे.