Thu, May 23, 2019 14:49
    ब्रेकिंग    होमपेज › Aurangabad › बोगस शाळांचा आकडा फुगला

बोगस शाळांचा आकडा फुगला

Published On: May 29 2018 1:44AM | Last Updated: May 29 2018 12:20AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात अनेक अनधिकृत शाळा सुरू आहेत. तरीही पंधरा दिवसांपूर्वी शिक्षण विभागाने जिल्ह्यात अवघ्या आठ शाळा अनधिकृत असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे शिक्षण विभागाची अनधिकृत शाळा चालकांवर विशेष मेहरनजर असून त्यांच्यातील ‘अर्थ’पूर्ण संबंधांमुळेच अभय दिले जात असल्याची चर्चा सुरू झाली. ही बाब लक्षात येताच शिक्षण विभागाने अवघ्या पंधरा दिवसांत अनधिकृत शाळांची नवी यादी जाहीर केली असून 14 शाळांना मान्यता नसल्याचे सांगितले.

‘जिल्ह्यात केवळ आठ अनधिकृत शाळा’ या मथळ्याखाली ‘दै. पुढारी’ने दि. 16 मे रोजी वृत्त प्रकाशित केले होते. जिल्ह्यात शाळांचे पेव फुटलेले असताना शिक्षण विभागाने अवघ्या आठच अनधिकृत शाळांची यादी कशी जाहीर केली, असा प्रश्‍न यानंतर उपस्थित करण्यात आला.

विशेष म्हणजे शिक्षण समितीने वारंवार अनधिकृत शाळा आणि सीबीएसईची मान्यता नसताना तसे फलक लावून प्रवेश सुरू केलेल्या शाळांचा सर्व्हे करण्याचे, तसेच त्यांच्यावर कारवाईच्या सूचना शिक्षणाधिकार्‍यांना दिल्या होत्या. मात्र, अधिकारी सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहेत. मात्र, वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर शिक्षण विभाग कामाला लागला आणि पंधरा दिवसांनी पुन्हा अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली. यावेळी जिल्ह्यात 14 शाळा अनधिकृत असून त्यांची यादी जि.प. मुख्यालयात लावण्यात आली आहे.

शिक्षण विभागाने लावलेल्या अनधिकृत शाळांची यादी

रोज बेबी सीटिंग इंग्रजी शाळा, किराडपुरा
बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल, जालान नगर
सेंट पॅट्रिक इंग्लिश स्कूल, जालना रोड
व्ही.ई.एस. किड्स कॅम्पस, शास्त्रीनगर
पॅराडाईज इंग्लिश स्कूल, एन-11 हडको
लिटिल एन्जल इंग्लिश स्कूल, नागेश्‍वरवाडी
अलफलाह इंग्लिश स्कूल, पैठणगेट
अलफलाह इंग्लिश स्कूल, चाऊस कॉलनी
अलफलाह इंग्लिश स्कूल, रोशनगेट
होलीनेम अकॅडमी, पडेगाव
हॅप्पी चाईल्ड इंग्लिश स्कूल, वाळूज
शिवाजी कन्या प्राथमिक शाळा, रांजणगाव, गंगापूर
रायभानजी जाधव इंग्लिश स्कूल, उंबरखेडा, कन्नड
इकरा स्कूल, पैठण

नवीन अनधिकृत शाळा शहरातीलच

औरंगाबाद तालुक्यात आता अनधिकृत शाळा नसल्याचे समितीच्या बैठकीत गटशिक्षणाधिकार्‍यांनी ठासून सांगितले होते. मात्र, नवीन सर्व्हेनुसार जाहीर करण्यात आलेल्या यादीत सहापैकी पाच शाळा शहरातीलच आहेत. विशेष म्हणजे जाहीर केलेल्या अनधिकृत शाळांवर कारवाईही केलेली नाही. त्यामुळे शिक्षण विभागातील अधिकारी आणि बोगस शाळांमध्ये ‘अर्थ’पूर्ण संबंध असल्याचा संशय घेतला जात आहे.

प्रवेश घेतल्यास तुम्हीच जबाबदार

जिल्ह्यातील 14 अनधिकृत शाळांच्या यादीचे बॅनर जि.प. मुख्यालयी लावण्यात आले आहे, तेही एकच. त्यामुळे पालकांना कोणती शाळा अनधिकृत आहे, याची माहिती कशी मिळणार, हा प्रश्‍नच आहे. अधिकृत शाळा, असे फलक लावण्याच्या शिक्षण समितीच्या सूचनांचीही अंमलबजावणी झाली नाही. विशेष म्हणजे या शाळा बंद करण्याऐवजी पालकांनी पाल्याचे प्रवेश त्यात केल्यास शिक्षण विभाग जबाबदार राहणार नाही, असे सांगून विभाग मोकळा झाला आहे.