Sun, Oct 20, 2019 01:26होमपेज › Aurangabad › पाच रुपये दूध दरवाढीचा लाभ दूध उत्पादकांच्या खात्यावर

पाच रुपये दूध दरवाढीचा लाभ दूध उत्पादकांच्या खात्यावर

Published On: Aug 27 2018 1:12AM | Last Updated: Aug 27 2018 1:02AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

शासनाने दूध दरवाढीचा निर्णय घेतल्यानंतर महिनाभराने दूध उत्पादकांना पाच रुपये दूध दरवाढीचा लाभ मिळायला सुरुवात झाली आहे. 31 जुलै रोजी निघालेल्या शासनादेशानुसार दूध उत्पादकांना पाच रुपये दरवाढ देण्याची सक्ती शासनाने केली आहे. जिल्हा सहकारी दूध संघाने 410 सहकारी संस्थांच्या माध्यमातून सुमारे सात हजार दूध उत्पादकांना वाढीवर दरानुसार रक्कम बँक खात्यात द्यायला सुरुवात केली आहे.

शेतकर्‍यांनी केलेल्या दूध आंदोलनाचा धसका घेऊन शासनाने दूध उत्पादकांना पाच रुपये दरवाढ देण्याची घोषणा केली. सुरुवातीला यात अनेक तांत्रिक गुंतागुंत निर्माण झाल्याने घोषणा होऊन सुमारे महिनाभराचा कालावधी होऊनही दूध उत्पादकांना याचा लाभ मिळत नव्हता. शेवटी 31 जुलै रोजी शासनाने नवीन शासनादेश पारित केल्यानंतर हा त्यांना मिळायला सुरुवात झाली आहे. शासनादेशानुसार सहकारी व खासगी दुग्ध संस्थांनी शेतकर्‍यांना हा वाढीव दर देण्यास बंधनकारक करण्यात आले आहे. शासनाने सहकारी व खासगी दूध प्रक्रिया संस्थांना वाढीव दराचे अनुदान देण्याचे जाहीर केले असून पिशवीबंद दुधासाठी हे अनुदान राहणार नाही.

45 हजार लिटर दुधालाच अनुदान

औरंगाबाद जिल्ह्यात सर्वात जास्त दूध संकलनाचे काम जिल्हा सहकारी दूध संघाकडून केले जाते. जिल्ह्यात सुमारे 7 ते 8 हजार दूध उत्पादक शेतकरी आहेत. संघाकडून प्रतिदिन सुमारे 90 ते 95 हजार लिटर दूधसंकलन केले जाते. यापैकी सुमारे 50 हजार लिटर दूध संघ पॅकेजिंग व बायप्रोडक्ट तयार करून विकतो. यावर अनुदान मिळणार नाही. तर शासनाच्या नियमानुसार मुंबईला पाठविल्या जाणार्‍या 45 हजार लिटर दुधालाच अनुदान मिळणार असल्याचे बोलले जात आहे. दूध उत्पादकांना 410 संस्थांमार्फत नवीन दर बँक खात्यावर देणे सुरू केल्याची माहिती संघाकडून मिळाली. त्यामुळे यापेक्षा जास्त दुधालाही अनुदान मिळाले पाहिजे अशी मागणी दूध उत्पादक करत आहेत.