Fri, Aug 23, 2019 23:15होमपेज › Aurangabad › अमितेशकुमार साहेब, औरंगाबाद पोलिसांचा आता वचक नाही

अमितेशकुमार साहेब, औरंगाबाद पोलिसांचा आता वचक नाही

Published On: May 20 2018 10:32PM | Last Updated: May 20 2018 10:59PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

अमितेशकुमार साहेब, आपण मुंबईला आलात आणि औरंगाबाद पोलिसांची ताकद संपली. आपला वचक, छाप होती. आपल्या नावावर गुंडागर्दी बंद होती. आपल्यानंतर आम्ही हिंमत खचलोत. भीमा कोरेगाव, कचरा प्रश्‍न आणि राजाबाजार, शहागंज या तिन्ही दंगलीत आम्ही जखमी झालोत. आपली आठवण औरंगाबादकरांना व आम्हास येते, असे पत्र लिहून जखमी सहायक पोलिस आयुक्‍त गोवर्धन कोळेकर यांनी औरंगाबाद पोलिसांची खदखद अखेर व्यक्‍त केली. मागच्या वर्षभरात पोलिसांचे किती खच्चीकरण झाले, हे त्यांच्या पत्रातून समोर आले. 

जुन्या औरंगाबादेत 11 आणि 12 मे रोजी घडलेल्या दंगलीनंतर सर्वच बाजुंनी पोलिसांवर आरोपांच्या फैरी झडत आहेत. शिवसेना, एमआयएमसह सर्वच विरोधी पक्षनेते पोलिसांवर अक्षरशः तुटून पडले आहेत. या दंगलीत एसीपी कोळेकर यांच्यासह रामेश्‍वर थोरात, ज्ञानोबा मुंढे, निरीक्षक श्रीपाद परोपकारी, हेमंत कदम, राजश्री आडे, पोलिस नाईक बापूराव बाविस्कर आदींना जबर मार लागला. कोळेकर तर तब्बल 12 तास बेशुद्ध होते. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे. आताही ते बोलू शकत नाहीत. त्यामुळे पत्र लिहून त्यांनी आपली खदखद व्यक्‍त केली.