Thu, Apr 25, 2019 21:25होमपेज › Aurangabad › नाला नसताना घरे का पाडली?

नाला नसताना घरे का पाडली?

Published On: Jun 13 2018 1:32AM | Last Updated: Jun 13 2018 12:44AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

जयभवानीनगर येथील ‘ज्या’ नाल्यासाठी दीडशे घरे पाडण्यात आली ‘तो’ नालाच मनपाच्या नकाशावर नसल्याचे सत्य शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्या खुलाशातून सोमवारी (दि.11) उघडकीस आले. तरीही नाला रुंदीकरण आणि खोलीकरणाच्या नावाने प्रवाहात येणारी 90 टक्के घरे पाडण्यात आली आहेत. नाला नसतानाही मनपा प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करीत आहोत. मात्र, वेळ पडल्यास मनपाला कोर्टातही खेचू असा इशारा जयभवानीनगर येथील रहिवाशांनी दिला आहे. 

तर केवळ दोन इमारतींमधील वादामुळे हे काम रखडले आहे. त्यामुळे हत्ती गेला, आता केवळ शेपूट राहिले. कोर्टात गेलो की बरीच वर्षे लागतील. त्यापेक्षा महापालिकेने उर्वरित कामे त्वरित करून द्यावीत, असे मत काही नागरिकांनी ‘पुढारी’कडे व्यक्‍त केले. मागील पावसाळ्यात जयभवानीनगर येथील शेकडो घरांमध्ये नाल्याचे पाणी शिरले होते. त्यानंतर महापालिकेने या भागातील नाल्याचा प्रवाह मोकळा करण्यासाठी घरे पाडापाडीची कारवाई सुरू केली. नाल्याच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळा ठरणारी जवळपास दीडशे घरे नाला रुंदीकरण आणि खोलीकरणासाठी पाडण्यात आली. मात्र, सारडा आणि गुंडरे यांच्या इमारतीमुळे मागील काही दिवसांपासून हे काम रखडले आहे. त्यात जून महिन्याच्या सुरुवातीला सलग दोन दिवस झालेल्या मान्सूनपूर्व जोरदार पावसामुळे या भागातील दीडशे घरांचा संपर्क तुुटला. 

नागरिकांच्या घरात नाल्याचे घाण पाणी शिरल्याने पुन्हा नाला रुंदीकरणाचा विषय चव्हाट्यावर आला. ती दोन घरे पाडण्यासाठी प्रशासन चालढकल करीत असल्याचा आरोप पदाधिकार्‍यांनी अनेकदा केला. सोमवारी (दि.11) सर्वसाधारणसभेत नगरसेविका मनीषा मुंढे यांनी हा विषय उपस्थित केला. त्यावर खुलासा करताना शहर अभियंता पानझडे यांनी जयभवानीनगरच्या नकाशावर नालाच नसल्याचे सांगितले. त्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले. जयभवानीनगर वसाहतीच्या नकाशावर नालाच नसताना मनपाने आमची घरे पाडलीच कशी? असा सवाल जयभवानीनगरवासीयांनी उपस्थित केला. मात्र, नाला रुंदीकरण आणि खोलीकरणाच्या नावाने प्रवाहात येणारी 90 टक्केे घरे पाडण्यात आली. नाला नसतानाही मनपा प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य केले आणि आताही करतोय. मात्र, वेळ पडल्यास मनपाला कोर्टातही खेचू असा इशारा जयभवानीनगर येथील रहिवाशांनीदिला आहे.