होमपेज › Aurangabad › ९०० मतदारांची मतदान केंद्रे बदलणार

९०० मतदारांची मतदान केंद्रे बदलणार

Published On: Dec 02 2017 2:05AM | Last Updated: Dec 02 2017 1:56AM

बुकमार्क करा

औरंगाबाद ः प्रतिनिधी 

पदवीधर अधिसभा निवडणुकीसाठी जालना जिल्ह्यातील 900 हून अधिक मतदारांना मतदान केंद्रे बदलून मिळणार आहेत. त्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या मतदारांनी मतदान केंद्र बदलून देण्याची विनंती निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे केली होती. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीधर सिनेटच्या मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या अलीकडेच प्रकाशित झाल्या. अंबड येथील 600 पदवीधर मतदारांना जालना येथील मतदान केंद्र देण्यात आले होते. उत्कर्ष पॅनलने या मतदारांसाठी अंबड येथे मतदानाची व्यवस्था करावी, अशी विनंती केली होती. त्यानुसार या मतदारांना अंबडचे मत्स्योदरी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय हे मतदान केंद्र देण्यात येणार आहे.

त्यासाठी केंद्रनिहाय मतदार यादीत दुरुस्ती करण्यात येत आहे. याशिवाय परतूर येथील 281 मतदारांना आष्टी (ता. परतूर) हे मतदान केंद्र देण्यात आले होते. त्यांना परतूरच केंद्र देण्यात यावे, अशी मागणी झाली. त्यामुळे तशी दुरुस्ती करण्यात येत आहे. याशिवाय जाफराबाद येथील मतदारांना बीड जिल्ह्यातील मतदान केंद्र दिले होते. त्यांना आता जालना किंवा जाफराबाद येथील मतदान केंद्र देण्याची प्रक्रिया सुरू आहे. या बदलामुळे काही मतदान केंद्रे वाढू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. अंबड येथील मत्स्योदरी शिक्षणशास्त्र महाविद्यालयात मतदान केंद्र देण्यात आले होते. तथापि, त्या इमारतीत आता संतुकराव कोकणे महाविद्यालय सुरू असल्यामुळे मतदान केंद्राचे नाव बदलण्याची विनंती निवडणूक विभागाकडे आली आहे.