Mon, Apr 22, 2019 04:26होमपेज › Aurangabad › शहीद जवान किरण थोरात यांच्यावर आज होणार अंत्यसंस्कार

शहीद जवान किरण थोरात यांच्यावर आज होणार अंत्यसंस्कार

Published On: Apr 13 2018 1:53AM | Last Updated: Apr 13 2018 1:42AMवैजापूर : प्रतिनिधी 

पाकिस्तानने नियंत्रण रेषेवरील शस्त्रसंधीचे उल्‍लंघन करून केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या वैजापूर तालुक्यातील फकिराबादवाडी येथील जवान किरण पोपटराव थोरात (31) यांना बुधवारी रात्री उपचारादरम्यान वीरमरण आले. गावात हे वृत्त पसरताच ग्रामपंचायतीने गुरुवारी एक दिवस दुखवटा जाहीर केला. तर दुःखाचा डोंगर कोसळलेल्या फकिराबादवाडीत दिवसभर चूल पेटलीच नाही. पोटचा गोळा गेला, याचा बदला घ्याच, असे म्हणत शहीद जवानाचे वडील पोपटराव थोरात यांनी आपला संताप व्यक्‍त केला. 

गुरुवारी सायंकाळी वीर जवान किरण थोरात यांचे पार्थिव औरंगाबाद विमानतळावर आले. शुक्रवारी सकाळी 8 वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार केले जाणार आहेत. गुरुवारी दिवसभर किरण थोरात यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी शेतवस्तीवर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या.  वैजापूर तालुक्यातील फकिराबादवाडीचे माजी सरपंच पोपटराव थोरात यांचा मुलगा किरण मराठा लाईट इंन्फंन्ट्रीत होते. बुधवारी रात्री पोपटराव यांचा मोठा मुलगा अमोल थोरात यांना वैजापूर पोलिस ठाण्यातील एका कर्मचार्‍याचा फोन आला. त्यांनी अमोलला सैन्य दलातील अधिकार्‍याला संपर्क साधण्याचे सांगताच थोरात कुटुंबीयांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी संपर्क साधला असता जखमी असलेले किरण हे देशासाठी शहीद झाल्याचे कळाले आणि कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. या दुःखद घटनेची माहिती समजताच वीरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अतुल येरमे, चांगदेव तांगडे यांच्यासह ग्रामस्थांनी थोरात यांची वस्ती गाठून कुटुंबीयांना धीर दिला. शहीद किरण थोरात यांच्या पश्‍चात वृद्ध आजोबा भावराव थोरात, वडील पोपटराव थोरात, आई कांताबाई, भाऊ अमोल, भावजय सविता, पत्नी आरती, चार वर्षीय मुलगी श्रेया व चार महिन्यांचा श्‍लोक हा मुलगा आहे. घरी एवढी माणसे का येत आहेत ? आई, आजोबा, काका का रडताहेत ? असे प्रश्‍न विचारून चिमुरड्या श्रेयाने सर्वांनाच भंडावून सोडले होते. 

माझी वाट पाहू नका... 

किरण हे सुटी घेऊन 2 जानेवारी 2018 रोजी आपल्या गावी म्हणजेच फकिराबादवाडी येथे आले होते. महिनाभर कुटुंबीयांसोबत घालविल्यावर त्यांची नियुक्‍त थेट पुंछ सेक्टर येथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर झाली होती. घरातून गेल्यावर अवघ्या 45 दिवसांतच त्यांना वीरमरण आले. शहीद किरण थोरात यांचे दोन दिवसांपूर्वीच पत्नी आरतीसोबत फोनवर बोलणे झाले होते. माझी वाट पाहू नका, मी आता फार बिझी आहे असे त्यांनी यावेळी कळविले होते.

सोडू नका, बदला घ्या..
 

पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यात माझ्या मुलाला वीरमरण आले. याचा मला सार्थ अभिमान वाटतो. शत्रूच्या हल्ल्यात माझा पोटचा गोळा गेला. सरकारने आता याचा बदला घ्यावा. माझ्या हातात जे शक्य आहे ते मी देशासाठी केले. 
       

           - पोपटराव थोरात, 
             शहीद जवानाचे वडील


गावसेवेत स्वतःला वाहून घेण्याचा होता मानस 

सैन्य दलात नायक पदावर पोहोचलेले किरण थोरात हे 1 जानेवारी 2007 रोजी झालेल्या भरती झाले. त्यानंतर 4 जानेवारी 2008 रोजी ते सैन्यात रुजू झाले. त्यांची पहिली पोस्टिंग ही नवशेरा (जम्मू-काश्मीर) येथे होती. यानंतर पठाणकोट (पंजाब), बैशाखी (अरुणाचल प्रदेश), कोटा (राजस्थान) येथे सेवा केल्यावर ते पुंछ (जम्मू-काश्मीर) येथे कार्यरत होते. किरण यांनी 11 वर्षे सैन्य दलाच्या मराठा लाईट इंन्फ्रंट्रीत देश सेवा केली. पुढील चार वर्षांची सेवा पूर्ण करून आपल्या गावी येण्याचा त्यांचा मानस होता. घरी आल्यावर वडिलांप्रमाणेच गावसेवेत वाहून घेण्याचे त्यांनी ठरविले होते. मात्र, काळाने झडप घातली अशी माहिती शहीद थोरात यांचे सैन्यदलातील सहकारी गोविंद पवार यांनी दिली. 

वैजापूर तालुक्याच्या इतिहासात सैन्य दलातील जवानाला वीर मरण येण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे समजते. गुरुवारी दिवसभर किरण थोरात यांच्या कुटुंबीयांना धीर देण्यासाठी व सांत्वनासाठी शेतवस्तीवर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. शहीद जवान किरण हे मराठा लाईट इंन्फ्रंट्रीत होते. बुधवारी रात्री पोपटराव यांचा मोठा मुलगा अमोल थोरात यांना जखमी झालेला आपला भाऊ देशासाठी शहीद झाल्याचे कळाले आणि संपूर्ण गावात शोककळा पसरली. 

 गुरुवारी सकाळी किरण यांच्यासोबत सैन्य दलात सहभागी झालेले व सध्या सुटीवर गावाकडे आलेले गोविंद पवार व सचिन वाळूंज यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांंशी संपर्क सुरू केला. त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार अंत्यविधीसाठी चबुतरा तयार करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. शेतात पोळ घालून साठविलेला कांदा इतरत्र हलविण्यासह या वस्तीवर येण्यासाठी चारही बाजूने रस्ते व वाहनांच्या पार्किंगसाठी जागेची साफसफाई युद्धपातळीवर सुरू करण्यात आली. 

शहीद जवान किरण यांचे वडील पोपटराव थोरात हे फकिराबादवाडीचे माजी सरपंच. समाजोपयोगी कामे करण्यात त्यांचा हातखंडा. त्यांचा मोठा मुलगा अमोल शेती करतो, तर धाकटा हा देशसेवेचे वेड असल्याने थेट सैन्यात भरती झालेला. या दोन्ही मुलांचा त्यांना आज अभिमान वाटतो. किरण हे सैन्य दलात भरती होण्यापूर्वी या परिसरातील नांदूर मधमेश्‍वर कालव्यात पाणी आले व शेतकर्‍यांना संजीवनी मिळाली. जानेवारी महिन्यात सुटीवर आलेले असताना किरण यांनी वडील पोपटराव यांना मोठ्या हौशीने दुचाकी घेऊन दिली होती. या बुलेटवरून फिरत असताना पोपटराव सर्वांनाच किरणने घेऊन दिली असे अभिमानाने सांगायचे.  

 देशासाठी शहीद झालेले किरण थोरात व मी सोबतच सैन्यात भरती झालो. एकाच परिसरातील असल्याने आम्ही त्या ठिकाणीही सोबतच राहायचो. शांत व हिंमतवान असलेल्या किरण यांच्यासोबतचे प्रसंग मी कधीच विसरू शकणार नाही. आमचा सहकारी किरण यांना आलेले वीरमरण हे प्रत्येकाच्या नशिबात नाही. शत्रूच्या हल्ल्यात आम्ही आमचा मित्र गमविला आहे. त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नसल्याची भावना नाईक (जवान) गोविंद पवार यांनी व्यक्‍त केली. 

 सैन्यात असलेले बुलडाणा जिल्ह्यातील परमेश्‍वर मुंडे यांना या घटनेची माहिती मिळताच तेही तडक फकिराबादवाडी येथे आले होते. आम्ही दोघांनी सुरुवातीपासून तर आता दोन महिन्यांपर्यंत सोबतच ड्यूटी केली. मनमिळावू स्वभावाचा सहकारी अशा पद्धतीने गमाविल्याने काय बोलावे हेच सुचत नाहीये. परभणी जिल्ह्यातील शहीद जवानाचे पार्थिव घेऊन आलेल्या परमेश्‍वर मुंडे यांच्यावर दुसर्‍या सहकार्‍याला शेवटचा निरोप देण्याची वेळ आल्याने ते फार वेळ स्तब्ध होते. 

 गुरुवारी दिवसभरात तहसीलदार सुमन मोरे, गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी या प्रमुख अधिकार्‍यांसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे रावसाहेब गोरे यांनी थोरात कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. दरम्यान, किरण थोरात यांच्या निधनाचे वृत्त कळताच सकाळी जि. प. सदस्य पंकज ठोंबरे व पंचायत समितीचे उपसभापती प्रभाकर बारसे यांनी थोरात वस्तीवर धाव घेतली. ठोंबरे व बारसे यांनी या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता गावाकडून येणार्‍या रस्त्यावरील काही ठिकाणी अडसर ठरत असलेली झाडे हटविली, तसेच नाल्याच्या दोन्ही बाजूने मुरूम टाकण्याचे काम सुरू केले. चबुतरा उभारण्यासाठी ठोंबरे यांनी जेसीबी यंत्र उपलब्ध केले तर परिसरातील ग्रामस्थांनी आपले ट्रॅक्टर व अन्य साहित्य आणून सहभाग घेतला. 

Tags : Aurangabad, funeral,  Shaheed, Kiran Thorat