Sun, Aug 25, 2019 04:21होमपेज › Aurangabad › चार तासांच्या मंथनानंतर ठरली पंचसूत्री

चार तासांच्या मंथनानंतर ठरली पंचसूत्री

Published On: Mar 10 2018 2:09AM | Last Updated: Mar 10 2018 1:05AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

बावीस दिवसांपासून धगधगत असलेल्या शहरातील कचर्‍याच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसेकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रतिनिधी म्हणून चार तास बैठक घेतली. यादरम्यान त्यांनी मनपा-महसूल अधिकारी, मनपाचे पदाधिकारी व तज्ज्ञांशी चर्चा केली. बैठकीतील विचारमंथनानंतर निघालेली ‘पंचसूत्री’ त्यांनी विभागीय आयुक्‍तांसह मनपा प्रशासनाच्या हाती ठेवत ‘हे शक्य आहे’, असा मूलमंत्र दिला. या पंचसूत्रीनुसार कार्यवाही झाल्यास  महिना-दीड महिन्यात कचर्‍याचा प्रश्‍न कायमस्वरूपी सुटेल, असा विश्‍वासही म्हैसेकर यांनी व्यक्‍त केला.

विभागीय आयुक्‍तालयात सकाळी दहा वाजेच्या सुमारास ही बैठक सुरू झाली. बैठकीला आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, मनपा आयुक्‍त डी. एम. मुगळीकर आदी उपस्थित होते. या बैठकीनंतर महापौर, उपमहापौर, सभापती, माजी महापौर, खासदार-आमदार यांच्याशीही म्हैसेकर यांनी चर्चा केली. कचर्‍याच्या शास्त्रोक्‍त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा अनुभव असणार्‍या संस्थांच्या पदाधिकारी, उद्योजकांशीही त्यांनी चर्चा केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी झालेल्या निर्णयांची माहिती दिली. म्हैसेकर म्हणाल्या, सोमवारपासून शासनाच्या जेम पोर्टलवर कचर्‍यावर प्रक्रिया करणार्‍या बेसिक मशीन खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. इंदूरचा स्वच्छता आराखडा तयार करणारी संस्था 7 दिवसांत आराखडा तयार करून देईल. त्यानंतर पुढील सात दिवसांत डीपीआर तयार होईल.