Wed, Aug 21, 2019 14:52होमपेज › Aurangabad › फुलंब्रीत इच्छुकांची भाऊगर्दी

फुलंब्रीत इच्छुकांची भाऊगर्दी

Published On: Mar 06 2018 1:53AM | Last Updated: Mar 06 2018 1:52AMफुलंब्री : धनंजय सीमंत

फुलंब्री विधानसभा मतदारसंघात सर्वच पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना 2019 मध्ये होणार्‍या निवडणुकीचे वेध लागले असून त्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे आतापासूनच पक्षाच्या नावावर स्वतंत्र भूमिका घेऊन फिरणारे नेते मतदारसंघात दिसून आहेत. या मतदारसंघाचे विद्यमान आमदार तथा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी लोकसभा निवडणूक लढवावी, अशी भाजपमधील काही पदाधिकार्‍यांची मनातून इच्छा आहे, मात्र तसे बागडे करणार नाहीत, असे मतदारांना वाटते. भाजप व काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी असल्याने ही निवडणूक लढण्यास अनेकांनी सध्या गुडघ्याला बांशिग बांधले आहे. कोणी किती फिरले तरी भाजप व काँग्रेस अशीच लढत आजपर्यंत राहिली. येणार्‍या निवडणुकीतही राहील, यात शंका नाही. 

2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे हरिभाऊ बागडे हे विजयी झाले. त्यांना 73 हजार 294 मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे यांना 69 हजार 683 मते मिळालेली आहेत. यात बागडे यांनी 3 हजार 611 मतांनी विजयी मिळविला. तिसर्‍या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुराधा चव्हाण होत्या. त्यांना 31 हजार 959 मते मिळाली. चव्हाण या सध्या भाजपत आहेत, तर चौथ्या क्रमांकावर शिवसेनेचे राजेंद्र ठोंबरे होते.

त्यांना 17 हजार 546 मते मिळाले होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-काँग्रेस अशीच लढत राहील. या दोन्ही पक्षांत एकमेकांचे विरोधक आहेत.  स्वपक्षीय विरोधकांमुळे पराभव पत्करावा लागतो. बागडे हे 1985 ते 2004 पर्यंत सलग चार वेळेस आमदार राहिले. त्यानंतर 2004 ते 2014 अशा दोन निवडणुकीत त्यांना काँग्रेसचे डॉ. काळे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. हा भराभव पक्षातील अंतर्गत कलहामुळे झाला. हे सर्वांना ज्ञात आहेत. यानंतर पुन्हा 2014 मध्ये बागडे हे काळे यांचा पराभव करून विजयी झाले. यात देखील कल्याण काळे यांना पक्षातील अंतर्गत कलहच भोवला.

2019 मध्ये होणार्‍या विधानसभा निवडणूक ऐवजी बागडे यांनी औरंगाबाद जिल्ह्यातून लोकसभा निवडणूक लढवावी, अशी पक्षामधील काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांची इच्छा आहे. म्हणजे आपला मार्ग मोकळा होईल, असे त्यांना वाटते, मात्र बागडे हे औरंगाबाद लोकसभेसाठी लढणार नाहीत. कारण त्यांना फुलंब्री मतदारसंघ हा खात्रीचा वाटतो. विशेष म्हणजे भाजपचा एक गट बागडेंना खासदारकीसाठी मदत करणार नाही,  याची बागडे यांना जाणीव आहे.

त्यामुळे लोकसभा लढण्याचा निर्णय ते कधी घेणार नाहीत, एवढे मात्र निश्‍चित. भाजपमधून इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे. यात नगराध्यक्ष सुहास शिरसाट, डॉ. गिरीश गाडेकर, डॉ.भागवत कराड, उपमहापौर विजय औताडे, भाऊसाहेब दहिहंडे, विकास दांडगे, अनुराधा चव्हाण यांचा समावेश आहे.  तर काँग्रेसकडून डॉ. कल्याण काळे, विलास औताडे, जगन्नाथ काळे, बाजार समितीचे सभापती सिंदप बोरसे हे इच्छुक आहेत. आज स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणीही इच्छुक नसल्याचे दिसत आहे. शिवसेनेमध्ये राजेंद्र ठोंबरे, त्र्यंबक तुपे व बाबासाहेब डांगे यांचे नावे घेतले जातात.