Wed, May 22, 2019 22:43होमपेज › Aurangabad › नमाड ते मुदखेड रेल्वे धावणार विजेवर

नमाड ते मुदखेड रेल्वे धावणार विजेवर

Published On: Dec 21 2017 1:54AM | Last Updated: Dec 21 2017 1:49AM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी 

आधी कोळशावर आणि त्यानंतर डिझेल इंजिनवर धावणारी रेल्वे आता एप्रिलनंतर विजेवर धावणार आहे. रेल्वे खात्याने मनमाड ते मुदखेड या रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणासाठी सर्वेक्षण पूर्ण केले असूून एप्रिलमध्ये हे काम हाती घेतले जाणार आहे, अशी माहिती नांदेड विभागाचे विभागीय व्यवस्थापक (डीआरएम) त्रिलोकज्ञ राभा यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

नांदेड विभागाचा पदभार घेतल्यानंतर विभागीय व्यवस्थापक त्रिलोकज्ञ राभा यांनी प्रथमच औरंगाबाद, चिकलठाणा आणि मुकुंदवाडी स्टेशनला भेट दिली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मनमाड - मुदखेड या रेल्वे मार्गावर धावणार्‍या गाड्या कमी आहेत. परभणी ते मिरखेल या स्टेशनदरम्यानचे दुहेरी लाईनचे काम पूर्ण झाले असून परभणी ते मनमाड या रेल्वेमार्गाचे दुहेरी लाईनचे सर्वेक्षणाचे कामही हाती घेतले जाणार आहे. त्याचबरोबर सिंगल लाईन विद्युतीकरणाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून कोणत्या ठिकाणी सब स्टेशन उभारायचे आहे, उड्डाणपूल आहे त्या ठिकाणी काय उपाययोजना करायची आहे, कोणत्या ठिकाणी वीज उपलब्ध होऊ शकते या सर्व तांत्रिक बाबींची पाहणी करण्यात आलेली आहे. 

या कामासाठी रेल्वेकडून निधी मिळणार असून त्या कामांचे नियोजन देखील करण्यात आले आहे. येत्या एप्रिल पासून मनमाड-मुदखेड या रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम हाती घेतले जाणार असल्याचे डीआरएम राभा यांनी स्पष्ट केले. रेल्वेचे विद्युतीकरण झाल्यावर रेल्वेची संख्या देखील वाढू शकते असे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. 

चिकलठाणा रेल्वे स्टेशनची राभा यांनी पाहणी केली असून त्या ठिकाणी पिटलाईन करण्याचा प्रस्ताव तत्कालीन डीआरएम डॉ. सिन्हा यांनी रेल्वे बोर्डाकडे सादर केला आहे. त्या ठिकाणी डब्यांची जागा आहे. आम्हाला  रेल्वे डब्यांसाठी जागा हवी असल्याने रेल्वेला चिकलठाणा येथे किमान एक एकर जागेची आवश्यकता असल्याचे राभा यांनी सांगितले. जागेसाठी रेल्वे प्रशासन राज्य सरकारकडे मागणी करणार आहे.