Thu, Apr 18, 2019 16:00होमपेज › Aurangabad › नगरसेवकाने पाठलाग करून काढली महिलेची छेड

नगरसेवकाने पाठलाग करून काढली महिलेची छेड

Published On: Jan 12 2018 1:56AM | Last Updated: Jan 12 2018 1:53AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

गेल्या सहा महिन्यांपासून एका 39 वर्षीय विवाहित महिलेची छेड काढत तिला वैतागून सोडणार्‍या आरोपीविरुद्ध अखेर गुरुवारी सिडको ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला. धक्‍कादायक बाब म्हणजे या गुन्ह्यातील आरोपी दुसरा तिसरा कोणी नसून तो सिडको एन-8 भागातील शिवसेनेचा नगरसेवक तथा गटनेता मकरंद कुलकर्णी हा आहे. आता पोलिस त्याचा शोध घेत आहेत. गुरुवारी सायंकाळीही नित्याप्रमाणे पाठलाग करून कुलकर्णीने भररस्त्यावर हात पकडून छेड काढल्यानंतर अखेर या महिलेने पोलिस ठाणे गाठले. त्यानंतर गुन्हा दाखल झाला. 

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला योगाचा, तर तिची मुलगी टेनिसचा क्‍लास करण्यासाठी जाते. ती सिडको परिसरातच राहते. गेल्या सहा महिन्यांपासून मकरंद कुलकर्णी हा या महिलेवर वाईट नजर ठेवून होता. तो सतत तिचा पाठलाग करायचा. तिला अडवून छेड काढायचा. मात्र, बदनामीच्या धास्तीने पीडित महिला त्याचा हा त्रास सहन करीत होती. तिच्या गप्प बसण्यामुळे त्याची हिंमत दिवसेंदिवस वाढतच चालली होती. 

गुरुवारी (11 जानेवारी) सायंकाळी सिडकोतील एका महाविद्यालयात पीडिता क्‍लासला गेली. तिची मैत्रीण आधीपासून तेथे वाट पाहात उभी होती. दरम्यान, आज मुलगी क्‍लासला येणार नाही, हे सांगण्यासाठी पीडिता मुलीच्या सरांकडे गेली. त्याच वेळी अचानक आरोपी मकरंद कुलकर्णी पाठीमागून आला. त्याने हात धरून तिला अडविले. या प्रकाराने घाबरलेल्या पीडितेने त्याच्या तावडीतून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ‘तू काहीही केले तरी मी तुला सोडणार नाही’ असे म्हणत त्याने पीडितेशी अश्‍लील वर्तन केले. त्यानंतर पीडितेने आरडाओरड केली. तेव्हा मात्र, पकडले जाण्याच्या भीतीने मकरंद कुलकर्णीने तेथून दुचाकीवरून पळ काढला. 

नगरसेवकाच्या सततच्या छेडछाडीला वैतागलेल्या पीडितेने सायंकाळी घडलेला हा प्रकार लगेच फोन करून पतीला सांगितला. त्यानंतर पतीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी महिला पोलिस आले. त्यांनी अधिक माहिती जाणून घेतल्यावर ठाण्यात तक्रार करण्याची विनंती केली. दरम्यान, रात्री उशिरा या प्रकरणी सिडको ठाण्यात पीडित महिलेची पोलिसांनी फिर्याद घेतली आणि आरोपी नगरसेवक मकरंद कुलकर्णीविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक 12/18 नुसार 354 (अ)(ब), 506 भादंवि कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक ठुबे हे करीत असल्याचे पोलिस निरीक्षक कैलास प्रजापती यांनी सांगितले.

सहा महिन्यांपासून देत होता त्रास

आरोपी नगरसेवक मकरंद कुलकर्णी हा मागील सहा ते सात महिन्यांपासून पाठलाग करून त्रास देत आहे. त्याला पीडितेसह तिच्या पतीने अनेकदा समजावूनही त्याच्या वागण्यात काहीच बदल झालेला नाही. त्याचे नेहमी पाठलाग करून त्रास देणे सुरूच होते. तसेच त्याने पीडितेसह पतीला जिवे मारण्याची धमकीही दिली, असे तक्रारीत म्हटले आहे.