Wed, Oct 16, 2019 20:19होमपेज › Aurangabad › गोळी झाडून डॉक्टरची आत्महत्या

गोळी झाडून डॉक्टरची आत्महत्या

Published On: Jan 06 2018 1:18AM | Last Updated: Jan 06 2018 12:49AM

बुकमार्क करा
वैजापूर : प्रतिनिधी

शहरातील आनंद हॉस्पिटल स्पेशालिटीमध्ये कार्यरत असलेल्या एका 29 वर्षीय डॉक्टरने छातीवर गावठी कट्ट्याने गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना 5 रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास शहरातील फुलेवाडी परिसरात घडली. दरम्यान या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

संजयकुमार टेंभरे (रा. चिरचाळ बांध, ता. आमगाव, जि. गोंदिया, ह. मु. फुलेवाडी परिसर, वैजापूर) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील फुलेवाडी रस्त्यावरील शिक्षक कॉलनीत असलेल्या वरच्या मजल्यावरील घरात डॉ. टेंभरे एकटेच वास्तव्यास होते. त्यांच्या घरासमोरच असलेल्या आनंद हॉस्पिटल स्पेशालिटीमध्ये गेल्या काही वर्षांपासून ते काम करीत होते.

शुक्रवारी टेंभरे हे नेहमीप्रमाणे हॉस्पिटलमध्ये जाऊन आले, असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दुपारच्या सुमारास हॉस्पिटलमधील सुरक्षा रक्षक टेंभरे यांना बोलविण्यासाठी त्यांच्या घरी गेले. तेव्हा खोलीचा दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे सुरक्षा रक्षकाने आवाज देऊन टेंभरे यांना बोलाविले; परंतु आतून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने सुरक्षा रक्षकाने भ्रमणध्वनीद्वारे हॉस्पिटलमधील आणखी एका सुरक्षा रक्षकास बोलाविले. दोघांनीही आवाज देऊन टेंभरे यांना बोलाविण्याचा प्रयत्न केला; परंतु काहीच प्रतिसाद न आल्याने यातील एकाने खिडकीतून डोकावून पाहिले, तेव्हा डॉ. टेंभरे हे मृतावस्थेत दिसले. 

त्यामुळे त्यांनी ही माहिती तत्काळ हॉस्पिटलमध्ये कळविली. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील लांजेवार यांच्यासह पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर, सहायक पोलिस निरीक्षक रामहरी जाधव, विजय खोकड, किशोर आघाडे, योगेश वाघमोडे, गणेश पाटील, करतारसिंग नयमामाणे आदी घटनास्थळी आले.

पोलिसांनी डॉ. टेंभरे यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, टेंभरे यांनी छातीवर गावठी कट्ट्याने गोळी झाडून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळी गावठी कट्ट्यासह पाच जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी औरंगाबाद येथे हलविला आहे. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर अंगुलीतज्ज्ञ व न्याय वैज्ञानिक पथकाने घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात

डॉ. टेंभरे यांनी गोळी झाडून आत्महत्या केल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. टेंभरे यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. टेंभरे हे सहायक वैद्यकीय कर्मचारी म्हणून हॉस्पिटलमध्ये काम करीत होते, अशी नोंद पोलिसांनी केली आहे. दुसरीकडे टेंभरे हे डॉक्टर म्हणूनच काम करीत असल्याची चर्चा वैद्यकीय क्षेत्रात सुरू आहे, तर हा गावठी कट्टा आला कोठून? या प्रश्‍नामुळे पोलिस यंत्रणाही चक्रावून गेली आहे. दरम्यान विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी मयत टेंभरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांनी सांगितले.