Wed, Mar 27, 2019 05:59होमपेज › Aurangabad › बनावट दारूचा कारखाना तलवाड्यात उद्ध्वस्त

बनावट दारूचा कारखाना तलवाड्यात उद्ध्वस्त

Published On: Jul 06 2018 1:30AM | Last Updated: Jul 06 2018 1:29AMऔरंगाबाद ः प्रतिनिधी

शेतात शेड उभारून देशी-विदेशी बनावट दारूची निर्मिती करणारा कारखाना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने उद्ध्वस्त केला. ही कारवाई सिल्लोड तालुक्यातील तलवाडा शिवारातील एका शेतात बुधवारी रात्री करण्यात आली. शेतमालक असलेल्या दोन भावांना अटक करून सुमारे सव्वासहा लाखांचा मुद्देमाल या ठिकाणाहून भरारी पथकाने जप्त केला. योगेश एकनाथ कावले व पंढरीनाथ एकनाथ कावले (रा. तलवाडा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

तलवाडा शिवारातील गट नं.253 जवळ पाबळ तलावाजवळ असलेल्या कावले बंधूंच्या शेतात पत्र्यांचे शेड उभारून दारूनिर्मिती करण्यात येत होती. ही माहिती बुधवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकास मिळाली. त्यावरून पथकाने बुधवारी शेतातील या शेडवर छापा मारला. या ठिकाणी पाहणी केली असता देशी-विदेशी दारू कंपनीचे बुच, बनावट बाटल्या सील करण्याकरिता लागणारी मशीन, रिकाम्या बाटल्या, रिकामे बॉक्स असे बनावट दारू बनविण्यासाठी लागणारे साहित्य असा सुमारे सव्वालाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. रिकाम्या बॉक्समध्ये दारूच्या बाटल्या लावून ते सील करत असलेल्या योगेश व पंढरीनाथ या दोघा भावांना पथकाने यावेळी ताब्यात घेतले. ही कारवाई उपायुक्त संगीता दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद कांबळे, बी. के. चाळणेवार, पी. बी. ठाकूर, तसेच व्ही. बी. मकरंद आदींनी केली. 

बाटल्या सीलचे मशीन जप्त

भरारी पथकाने या बनावट दारूनिर्मिती कारखान्यातून 236 बनावट विदेशी दारूच्या बाटल्या, विविध ब्रॅण्डची नकली दारू 22,070 सील असलेली बुचे, बाटल्या सील करणारे मशीन, 4 हजार विविध ब्रॅण्डच्या रिकाम्या बाटल्या, व्हिस्की 180 मि.लि.च्या बाटल्यांच्या 25 हजार पॉलिकॅप, देशी दारूचे 450 रिकामे बॉक्स, बनावट दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य असा मुद्देमाल जप्त  केला आहे.

कारखाना चालविणारे पसार

तलवाडा शिवारातील या शेताचे मालक असलेले योगेश आणि पंढरीनाथ कावले या दोघांकडून दोन जणांनी शेडसाठी भाड्याने जागा घेतली होती. तसेच बनावट दारू तयार केल्यावर ती बाटलीत सील करून बॉक्समध्ये पॅक करण्यासाठी दोघा भावांना प्रत्येक पाचशे रुपये दररोज देण्यात येत होते. मात्र पथक कारवाई करण्यासाठी गेले तेव्हा दोघे भाऊच हाती लागले. मुख्य आरोपी मात्र पसार आहेत. सध्या त्यांचा शोध सुरू आहे. ते दोघे सापडल्यावर बनावट दारू तयार करण्यासाठी ते कच्चा माल कुठून आणत होते. तसेच या दारूची कोठे विक्री करत होते, हे स्पष्ट होणार असल्याचे पथकाचे प्रमुख निरीक्षक आनंद कांबळे यांनी सांगितले.