Thu, Jun 20, 2019 01:31होमपेज › Aurangabad › उड्डाणपुलाच्या नामकरणात गोंधळ

उड्डाणपुलाच्या नामकरणात गोंधळ

Published On: May 28 2018 12:17AM | Last Updated: May 28 2018 12:14AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

महानगर पालिकेच्या वतीने रविवारी सिडको उड्डाणपुलाला स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे नाव देण्यात आले. सुरुवातीला राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या काही कार्यकर्त्यांनी कार्यक्रम स्थळी येऊन हे नाव देण्यास जोरदार विरोध दर्शविला. तसेच महापौर आणि स्थानिक आमदारांना घेराव घालत हा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली. मात्र महापौरांनी कार्यक्रम रद्द करण्यास नकार दिला. यावेळी पोलिसांनी सुमारे चाळीस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर हा नामकरणाचा कार्यक्रम पार पडला.

मनपाच्या वतीने रविवारी सकाळी 11 वाजता सिडको उड्डाणपुलाच्या नामकरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. बरोबर अकरा वाजता राष्ट्रीय बंजारा परिषदेचे काही कार्यकर्ते तिथे दाखल झाले. त्यावेळी कार्यक्रम सुरू झालेला नव्हता. केवळ महापौर नंदकुमार घोडेले आणि आमदार अतुल सावे हेच मान्यवर तिथे हजर होते. बंजारा परिषदेच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेत या नामकरणास विरोध केला. सिडको चौकात वसंतराव नाईक यांचा पुतळा आहे. त्यामुळे या उड्डाणपुलाला दुसर्‍या व्यक्‍तीचे नाव देणे चुकीचे आहे, असे या कार्यकर्त्यांचे म्हणणे होते.

त्यावर महापौरांनी सर्वसाधारण सभेत सावरकरांचे नाव देण्याबाबत ठराव झालेला आहे, असा खुलासा केला. त्यानंतरही कार्यकर्ते आणखी संतप्‍त झाले. त्यांनी आमदार सावे आणि महापौरांना घेराव घालत हा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली. मात्र महापौरांनी हा कार्यक्रम आता ऐन वेळी रद्द करता येणार नाही, असे सांगत, हवेे तर आपण येथील पाटी बदलून त्यावर आधी वसंतराव नाईक चौक आणि त्याखाली वि. दा. सावरकर असे लिह उड्डाणपूल असे नाव लिहू, असा प्रस्ताव ठेवला; परंतु त्यावर या कार्यकर्त्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी घोषणाबाजीसह निदर्शने सुरू केली.

त्यामुळे पोलिसांनी चाळीस कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन ठाण्यात नेले. थोड्याच वेळात खा. खैरे तिथे पोहचले. त्यानंतर हा नामकरणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी आमदार संजय शिरसाट, उपमहापौर विजय औताडे, सभागृह नेता विकास जैन, माजी आमदार किशनचंद तनवाणी, नगरसेवक राजू वैद्य, नगरसेवक गजानन बारवाल, शिवसेनेचे अंबादास दानवे, भाजपचे मिलिंद दाभाडे, नगरसेविका माधुरी अदवंत, कीर्ती शिंदे, मनोज गांगवे आदींची उपस्थिती होती.

जखमेवर मीठ चोळण्याचे काम

वसंतराव नाईक चौकातील उड्डाणपुलास वसंतराव नाईक उड्डाणपूल असे नाव देण्यात यावे, अशी मागणी आम्ही दोन वर्षांपासून सतत करत आहोत. त्यासाठी रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले; परंतु मनपाने ती मागणी मान्य केली नाही. आता या उड्डाणपुलास सावरकरांचे नाव देणे म्हणजे आमच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे झाले आहे, असे राष्ट्रीय बंजारा परिषदेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर डॉ. कृष्णा राठोड, रविकांत राठोड, दत्ताभाऊ राठोड, विकास जाधव, रविराज राठोड, सुनील चव्हाण, संतोष चव्हाण आदींची नावे आहेत. 

दोघांविषयीही नितांत आदर

आम्हाला वसंतराव नाईक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या दोघांविषयीही नितांत आदर आहे. इथे कुण्याच्या भावना दुखावण्याचा किंवा अनादर करण्याचा प्रश्‍नच नाही. या उड्डाणपुलास सावरकरांचे नाव देण्याचा प्रस्ताव मनपा सभेत मंजूर झालेला आहे. त्यानुसार हा कार्यक्रम घेण्यात आला, तरीदेखील आता इथे नवीन बोर्ड बसवून त्यावर आधी वसंतराव नाईक चौक आणि त्या खाली स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल असे लिहिले जाईल, असा खुलासा महापौर नंदकुमार घोडेले यांनी केला.