Wed, Jun 03, 2020 19:04होमपेज › Aurangabad › अमोनिया वायू शोधणारी स्वस्त उपकरणे साकारली

अमोनिया वायू शोधणारी स्वस्त उपकरणे साकारली

Published On: Dec 29 2017 1:53AM | Last Updated: Dec 29 2017 1:53AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्सड् सेंसर टेक्नॉलॉजीच्या दोन संशोधक विद्यार्थ्यांनी अमोनिया गॅस व त्याचे प्रमाण शोधणारी दोन किफायतशीर संवेदी (सेंसर) उपकरणे विकसित केली आहेत. त्यांचे पेटंट मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे, अशी माहिती रुसा केंद्राचे संचालक प्रा. डॉ. महेंद्र शिरसाट यांनी दिली. अमोनियाप्रमाणे इतर घातक वायूंचे अस्तित्व आणि त्यांचे प्रमाण याचा छडा लावणारी उपकरणे विकसित करण्यावरही काम सुरू आहे, असे ते म्हणाले. 

अमोनिया गॅस सेंसर उपकरणे बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, त्याची किंमत 22 ते 60 हजार रुपये यादरम्यान आहे. विद्यापीठाने विकसित केलेल्या दोन्ही उपकरणांचा निर्मिती खर्च 500 रुपयांच्या आत आहे. अमोनिया वायूची पातळी दर्शविणारा इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले आणि अलार्मची सुविधा असलेल्या उपकरणाच्या निर्मितीवर 400 रुपयांचा तर लाल दिव्याद्वारे अमोनियाच्या धोकादायक प्रमाणाबाबत जागरूक करणार्‍या उपकरणासाठी अवघे दीडशे रुपये खर्च झाले आहेत. या यंत्रात तंत्रज्ञान सुलभीकरणाचे तंत्र वापरण्यात आले आहे. त्यामुळे ती वापरण्यास सोपी आहेत. या दोन्ही यंत्रांच्या पेटंटसाठी दिल्लीतील संस्थेकडे अर्ज करण्यात आला असून पेटंट मिळताच या तंत्रज्ञानाचा वापर करून किफायतशीर अमोनिया सेंसर यंत्रे उत्पादित करण्यासाठी खासगी कंपनीशी करार करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. डॉ. शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन बोडखे आणि प्रमोद शिंदे यांनी हे उपकरण विकसित केले आहे. 

अमोनिया वायू मानवी शरीरासाठी धोकादायक आहे. अमोनिया वायूचे प्रमाण धोकादायक पातळीहून अधिक असलेल्या ठिकाणी मर्यादेहून जास्त वेळ थांबल्यास प्राणही जाऊ शकतात. मुतारीची नियमित स्वच्छता होत नसेल तर तेथे अमोनियाचे प्रमाण अधिक असते. या वायूच्या संपर्कात आल्यामुळे शरीराच्या मज्जासंस्थेवर परिणाम होतो. शहरातील चेंबर स्वच्छ करताना अनेकांना प्राणाला मुकावे लागले आहे. अमोनियामुळेच हे घडते. विविध कारखान्यांत अमोनियाचा वापर करावा लागतो. तेथे गळती झाल्यास त्याचे आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. हे उपकरण बसवलेले असेल तर अमोनिया गळतीसह त्याचे प्रमाण लगेच कळू शकेल.

या उपकरणात एसएमएसद्वारे संदेश पाठविण्याचे तंत्रज्ञान वापरल्यास हे उपकरण अमोनिया वायूची पातळी सांगणारा संदेश फिड केलेल्या मोबाइल क्रमांकावर पाठवू शकते. त्यासाठी निर्मिती खर्च थोडा वाढेल, असे शिंदे आणि बोडखे यांनी सांगितले.