Tue, May 21, 2019 13:19होमपेज › Aurangabad › गरीब विद्यापीठाच्या पंचतारांकित भोजनावळी

गरीब विद्यापीठाच्या पंचतारांकित भोजनावळी

Published On: Apr 29 2018 2:10AM | Last Updated: Apr 29 2018 12:53AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ म्हणजे गरीब आणि मागास भागातील विद्यापीठ. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि सुविधा देण्याबाबत आजही ते मागासच आहे. मात्र, पंचतारांकित भोजनावळीचे म्हणाल तर राज्यातील अन्य एकही विद्यापीठ त्याचा हात धरू शकणार नाही. अलीकडेच आयोजित एका समारंभातील भोजनावळीवर प्रशासनाने तब्बल एक लाख 23 हजार 900 रुपयांचा चुराडा केला. बरं एवढ्या पैशांतून किती माणसे जेवली तर केवळ 118. म्हणजे विद्यापीठाला प्रतिमाणसी जेवण पडले 1050 रुपयांना. पाव खाऊन शिक्षण घेणार्‍या युगपुरुषांच्या नावे असलेल्या या विद्यापीठाच्या प्रशासनाला आपण कशावर आणि किती खर्च करतो आहोत, याचेही भान राहिले नसल्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. 

शहरातील एका उद्योगपतींची राष्ट्रीय उच्चतर शिक्षण कौन्सिलच्या (रुसा) राज्य शाखेवर झालेल्या निवडीनिमित्त त्यांचा सत्कार आणि विद्यापीठ, उद्योग जगतात सहकार्याचा सेतू निर्माण करण्यासाठी या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या सरकारी निवासस्थानाच्या हिरवळीवर आयोजित या कार्यक्रमासाठी शहरातील उद्योजक आणि व्यावसायिकांना आमंत्रित करण्यात आले होते. चर्चा, सत्कार आणि भोजन असे कार्यक्रमाचे स्वरूप होते. भोजन व्यवस्था शहरातील एका हॉटेलकडे होती. प्रशासनाने दिलेल्या सूचनेप्रमाणे हॉटेल व्यावसायिकाने जेवणाची पंचतारांकित व्यवस्था केली.

सर्वांनी जेवणाची प्रशंसा केली. मात्र, त्याने सादर केलेले बिल पाहून लेखा विभागाचे डोळे विस्फारले. केवळ 118 माणसांच्या जेवणाचे बिल एक लाख 23 हजार 900 रुपये कसे ? अस काय होत जेवणात? असे अनेक प्रश्‍न उपस्थित झाले आहेत.

हे बिल मंजूर होणार, संबंधित व्यावसायिकाला त्याचे पैसे मिळणार. परंतु, एकीकडे विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या वसतिगृहासह अनेक विभागांत पाण्याची बोंब असताना विद्यापीठ अशा पंचतारांकित भोजनावळी आयोजित करत असल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त होत आहे. दहा हजार रुपयांहून अधिक दराच्या सेवेसाठी निविदा मागवाव्या लागतात. मात्र, एक लाख रुपयांहून अधिक दराचे हे काम विनानिविदा देण्यात आले हे विशेष.