Mon, Jun 24, 2019 17:34होमपेज › Aurangabad › संकेत कुलकर्णी खून प्रकरण : बाहेर आल्यावर बघून घेईन

संकेत कुलकर्णी खून प्रकरण : बाहेर आल्यावर बघून घेईन

Published On: Apr 28 2018 1:52AM | Last Updated: Apr 28 2018 1:48AMऔरंगाबाद : विशेष प्रतिनिधी

संकेत कुलकर्णी खून प्रकरणातील मुख्य आरोपी संकेत जायभाये याने हर्सूल कारागृहात ओळख परेड सुरू असताना शुक्रवारी (दि.27) साक्षीदारांना धमकावले. ‘बाहेर आल्यावर तुम्हाला बघून घेईन’, अशी धमकी जायभाये याने पोलिसांसमक्ष दिली. साक्षीदाराच्या तक्रारीवरून या प्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

तरुणीशी बोलण्याच्या वादातून संकेत संजय कुलकर्णी (18) याचा आरोपी संकेत प्रल्हाद जायभाये (22) याने ठाकरेनगरात 23 मार्च रोजी कारखाली चिरडून अमानुष खून केला होता. मुकुंदवाडी पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपी संकेत जायभाये याच्यासह विजय नारायण जौक (24, रा. बाळापूर), उमर अफसर पटेल (19, रा. कौसर पार्क, देवळाई) आणि संकेत मचे (रा. देवळाई) या चौघाजणांना अटक केली होती. चौघेही आरोपी सध्या हर्सूल कारागृहात आहेत. 

आठ साक्षीदारांनी ओळखले

हर्सूल कारागृहात असणार्‍या चार आरोपींची शुक्रवारी आठ साक्षीदांसमोर ओळखपरेड घेण्यात आली. सरकारी पंचांसमोर झालेल्या साक्षीच्या वेळी सर्व साक्षीदारांनी आरोपींना ओळखले. ओळख परेडनंतर मुख्य आरोपी संकेत जायभाये हा सरकारी पंच व एका साक्षीदारासमोर आला. आता जपून राहा, बाहेर आल्यावर तुम्हाला बघून घेईन, अशी उघड धमकी त्याने दिली. जायभाये याने ज्या क्रूर पद्धतीने संकेत कुलकर्णी याला संपवले होते, ते पाहता काहीक्षण साक्षीदारांची घाबरगुंडी उडाली. ही बाब त्यांनी पोलिस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे यांच्या निदर्शनास आणून दिली. चंद्रमोरे यांनी साक्षीदारास हर्सूल ठाण्यात तक्रार नोंदविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार शुक्रवारी रात्री तेथे तक्रार नोंदविण्यात आली.