Tue, Mar 26, 2019 22:33होमपेज › Aurangabad › बालिकेचे अपहरण करणार्‍या  आरोपीला सिनेस्टाईलने पकडले

बालिकेचे अपहरण करणार्‍या  आरोपीला सिनेस्टाईलने पकडले

Published On: May 28 2018 1:46AM | Last Updated: May 27 2018 11:59PMकरमाड : प्रतिनिधी  

आठ वर्षांच्या बालिकेचे अपहरण करणार्‍या आरोपीचा डोंगर दर्‍याखोर्‍यातून तब्बल साडेतीन तास सिनेस्टाईल पाठलाग करून करमाड ठाण्याच्या पोलिसांनी शेकडो नागरिकांच्या मदतीने त्याला ताब्यात घेण्यात यश मिळविले. हा थरार रविवारी दुपारी दरेगाव शिवारातील डोंगर परिसरात घडला. याप्रकरणी आरोपीविरोधात करमाड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय पवार  (30, रा. गाढेजळगाव ता. जि. औरंगाबाद) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. 

पोलिसांच्या माहिती नुसार औरंगाबाद तालुक्यातील शेवगा येथील एका आठ वर्षीय बालिकेला शनिवारी (दि.26) सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास या आरोपीने पळवून नेले. हा प्रकार गावातील एका दुकानदाराने बघितल्यानंतर त्याने याबाबतची माहिती बालिकेच्या घरच्या लोकांना दिली. सदर आरोपीने बालिकेला डोंगर परिसरातून पळवून नेल्याचेहीही माहिती दुकानदाराने दिली. 

या प्रकरणाची माहिती काही तासांत परिसरात वार्‍यासारखी पसरली, दरम्यान सकाळी बालिकेच्या नातेवाइकांनी करमाड पोलिस ठाणे गाडून तक्रार नोंदविली. त्यानंतर सकाळी 9.30 वाजता पोलिसांनी शेकडो नागरिकांच्या मदतीने परिसरातील डोंगराच्या दर्‍या खोर्‍यातून सिनेस्टाईलआरोपीचा तब्बल साडेतीन तास भर उन्हात पाठलाग करून त्याला एक वाजता दरेगाव शिवारातील डोंगर परिसरात बालिकेसह ताब्यात घेतले. त्यानंतर मुलीला पोलिसांनी तिच्या नातेवाईकांकडे स्वाधीन करून आरोपीला करमाड ठाण्यात आणण्यात आले. याप्रकणी आरोपी विरोधात पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. 

नागरिकांनी डोंगर परिसराला टाकला वेढा

या आरोपीचा शोध घेण्यासाठी शेवगासह परिसरातील शेकडो गावकर्‍यांनी डोंगर परिसराला वेढा टाकला. कुठल्याही परिस्थितीत या आरोपीला पोलिसांच्या ताब्यात द्यायचे, असा निर्धार गावकर्‍यांनी केला होता. अखेर साडेतीन तासांनंतर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. आणि आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. याकामी पोलिस निरीक्षक बालक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार रवींद्र साळवे, सचिन राठोड, राहुल मोहतमाल यांच्यासह रफिक मिर्झा, कैलास सुलाने, अन्सार बेग मिर्झा यांच्या शेकडो गावकर्‍यांनी भर उन्हात परिश्रम घेतले.