Thu, Jul 18, 2019 15:27होमपेज › Aurangabad › जिल्हाधिकारी अडकले कचर्‍यात

जिल्हाधिकारी अडकले कचर्‍यात

Published On: Apr 26 2018 1:24AM | Last Updated: Apr 26 2018 12:40AMऔरंगाबाद : रवी माताडे

मनपाचा अतिरिक्‍त कारभार जिल्हाधिकार्‍यांकडे आल्याने गेल्या दीड महिन्यापासून जिल्हाधिकारी हे कचरा प्रश्‍न सोडवण्यातच अधिक व्यग्र झालेले आहेत. तत्कालीन जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांचा जास्तीत जास्त वेळ कचरा प्रश्‍नावरील बैठका आणि नियोजनात गेला, तर नवनियुक्‍त जिल्हाधिकारीही कचर्‍यात अडकलेले आहेत. परिणामी, 21 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची प्रकरणे निर्णयाअभावी रखडली आहेत. एप्रिल महिन्यात 8 आत्महत्या झाल्या असून ही प्रकरणेही चौकशीस्तरावर आहेत. तर एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात लागून सुट्या आल्याने या प्रकरणांवर निर्णयासाठी समितीची बैठक मे महिन्यात होण्याची शक्यता आहे.

शहरातील कचरा प्रश्‍न गंभीर बनलेला असतानाच, 16 मार्च रोजी तत्कालीन मनपा आयुक्‍त डी. एम. मुगळीकर यांची बदली शासनाने केली व मनपाचा प्रभारी कारभार जिल्हाधिकार्‍यांकडे सोपवला. अतिरिक्‍त कारभार आल्याने तत्कालीन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचा अधिकाधिक वेळ हा कचर्‍याच्या नियोजनात गेला. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचा गाडा हाकण्याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. बोंडअळीचा मारा, दुष्काळ, गारपिटीने शेतीचे मोठे नुकसान केल्याने शेतकर्‍यांचे हात रिकामेच राहिले आहेत. त्यातच कर्जमाफीनेही फारसा दिलासा दिलेला नाही. परिणामी, यंदाही जिल्ह्यासह मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला शासनाकडून दिल्या जाणार्‍या 1 लाखाच्या मदतीबाबत जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील समिती निर्णय घेते. या समितीची बैठक दर महिन्यात एकदा होते. औरंगाबाद जिल्ह्यात फेब्रुवारी 2018 पर्यंत या समितीने 3 प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित ठेवली होती.

मार्च महिन्यात 15 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. त्यातील 5 जणांच्या कुटुंबांना समितीने मदतीस पात्र ठरवले. तर 10 प्रकरणांत पुन्हा चौकशीचे आदेश दिले. त्यामुळे मार्चअखेरपर्यंत जिल्ह्यात 13 प्रकरणे चौकशीस्तरावर होती. राम यांनी त्याच दिवशी अतिरिक्‍त जिल्हाधिकार्‍यांकडे पदभार सोपवून पुण्याला रवाना झाले. तर चव्हाण यांच्या बदलीला शासनाने दुसर्‍या दिवशी स्थगिती दिली. त्यानंतर दोन दिवसांनी उदय चौधरी यांच्या नियुक्‍तीचे आदेश धडकले. 19 एप्रिल रोजी चौधरींनी सूत्रे हाती घेतली, तेव्हापासून तेही कचरा प्रश्‍न सोडवण्यात अडकलेले आहेत. 

Tags : Aurangabad, Collector, stuck, trash