Wed, Jan 23, 2019 11:46होमपेज › Aurangabad › मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री खात्याचा राजीनामा द्यावा

मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री खात्याचा राजीनामा द्यावा

Published On: Dec 08 2017 12:44PM | Last Updated: Dec 08 2017 12:44PM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी 
 
राज्यातील मुलींची सुरक्षितता जपणे आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात यावी, यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने विभागीय आयुक्‍तांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले आहे. तसेच गृहमंत्रिपद सांभाळण्यास अपयशी ठरत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री खात्याचा राजीनामा द्यावा, असेही निवेदनात म्हटले आहे.

कोपर्डीतील पीडितेच्या गुन्हेगारांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. याचे सर्वस्तरातून स्वागतही करण्यात आले. मात्र, नुकतीच पुण्यातील चाकण येथे पुन्हा कोपर्डीतील घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. मराठा समाजातील मुलीवर अत्याचार करून तिचा चेहरा ठेचला आणि तिचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत फेकून देण्यात आला. पोलिसांकडून हे प्रकरण दडपण्याचाही प्रयत्न झाला. तसेच अमरावती येथील दुसर्‍या घटनेतही समाजातील मुलीवर एकतर्फी प्रेमातून अ‍ॅसिड हल्‍ला केला. तिची प्रकृतीही नाजूक आहे. या दोन्ही प्रकरणांतील आरोपींना त्वरित अटक करून त्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे, अन्यथा मराठा क्रांती मोर्चा राज्यभर आंदोलन उभे करील, असे निवेदनात म्हटले आहे. 

मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्रिपदही स्वतःकडे ठेवले. मात्र, राज्याची कायदा व सुव्यवस्था राखण्यास, तसेच समाजकंटकांवर वचक ठेवण्यास ते पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा आणि जबाबदार मंत्र्याकडे ते खाते सोपवावे, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.