Fri, Feb 22, 2019 09:41होमपेज › Aurangabad › भाजपचे कार्यालय फोडले

भाजपचे कार्यालय फोडले

Published On: Feb 17 2018 2:05AM | Last Updated: Feb 17 2018 12:52AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

अहमदनगर महापालिकेतील भाजपचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त व्यक्तव्याचे शहरात पडसाद उमटले. शिवप्रेमी नागरिकांनी सायंकाळी पाच वाजता उस्मानपुर्‍यातील गोपाल टी येथील भाजपचे कार्यालय फोडले. क्रांती चौकात छिंदम यांच्या फोटोला जोडे मारो, तर टी.व्ही. सेंटर चौकातही त्याच्या पुतळ्यास फाशी देऊन निषेध नोंदवण्यात आला.
अवघ्या तीन दिवसांवर शिवजयंती येऊन ठेपलेली असताना भाजपच्या अहमदनगरच्या उपमहापौरांनी कर्मचार्‍याला उद्देशून बोलताना शिवजयंती आणि शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले.

दुपारनंतर ही बातमी सर्वत्र पसरली. शहरातही या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. संतप्त शिवप्रेमींनी मोटारसायकलवर येऊन उस्मानपुर्‍यातील गोपाल टी येथे असलेले भाजपचे संपर्क कार्यालय फोडले. कार्यालयाचा दरवाजा आणि खिडकीच्या काचा फोडल्या. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. विशेष म्हणजे उशिरापर्यंत भाजपच्या शहराध्यक्षासह एकही नेता कार्यालयाकडे फिरकला नव्हता.

मराठा क्रांती मोर्चाची निदर्शने
छिंदम यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह व्यक्तव्याच्या निषेधार्थ  मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सायंकाळी सहा वाजता क्रांती चौकात आंदोलन केले. या आंदोलनात अप्पासाहेब कुढेकर, रमेश केरे, नीलेश ढवळे, अशोक मोरे, विवेक वाकुडे, शैलेश भिसे, अक्षय पाटील, डी. के. चव्हाण, किशोर शेरावत, किरण काळे, यांच्यासह शिवसेना जिल्हा प्रमुख अंबादास दानवे आणि नगरसेवक राजेंद्र जंजाळही सहभागी झाले होते. 

यावेळी भाजप सरकार आणि छिंदम यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. छिंदम यांच्या फोटोस जोडे मारो आंदोलन केल्यानंतर त्यांचा फोटा जाळून निषेध नोंदवण्यात आला.