Thu, Jul 18, 2019 00:02होमपेज › Aurangabad › ‘त्या’ महिलेचा खून अनैतिक संबंधातूनच

‘त्या’ महिलेचा खून अनैतिक संबंधातूनच

Published On: Apr 24 2018 1:04AM | Last Updated: Apr 24 2018 12:33AMवाळूज महानगर : प्रतिनिधी

जोगेश्‍वरी येथे 40 वर्षीय महिलेचा गळा आवळून झालेल्या खुनाचे गूढ उकलण्यात अखेर वाळूज एमआयडीसी पोलिसांना यश आले. अनैतिक संबंध आणि त्यातून पैसे देण्या-घेण्यावरून झालेल्या वादातून या महिलेचा खून झाल्याचे स्पष्ट झाले असून, या प्रकरणी पोलिसांनी रविवारी एका आरोपीला अटक केली.

इम्रानखान इब्राहिमखान पठाण (28, रा. जोगेश्‍वरी, ता. गंगापूर) असे या आरोपीचे नाव आहे. घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगिलते की, वाळूज औद्योगिक क्षेत्रातील जोगेश्‍वरी येथील गट नं. 183 मध्ये 18 एप्रिल रोजी पोलिसांना एका अनोळखी महिलेचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळला होता. शवविच्छेदन केल्यानंतर महिलेचा गळा आवळून खून झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले होते. सदरील मृतदेहाची ओळख पटावी, यासाठी पोलिसांनी सोशल मीडियाचा वापर केला होता. यावरून 19 एप्रिल रोजी रात्री उशिरा महिलेची ओळख पटली होती. 

सदरील महिलेचे नाव संगीता विलास शिंदे (40, रा. नेवासा फाटा) असे असून ती नेवासा फाटा येथे एका खासगी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करीत असे. मग वाळूज एमआयडीसी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. नातेवाइकांकडून मृत महिलेचा मोबाइल नंबर मिळवला. मग कॉल रेकॉर्ड तपासले. तेव्हा एका खुनाच्या गुन्ह्यात हर्सूल जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या शेख जावेद याच्या नंबरवरून अनेकदा महिलेला फोन आल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिस चक्रावले. अधिक तपासात शेख जावेदचा मोबाइल त्याचा नातेवाईक इम्रानखान पठाण हा सध्या वापरत असल्याचे अखेर तपासात समोर आले. विशेष म्हणजे खुनाच्या घटनेपासून इम्रानखान जोगेश्‍वरीतून गायब असल्याचे पोलिसांना समजले. 

शेवटी तो औरंगाबाद येथील बहिणीकडे लपून बसला असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्याला पुंडलिकनगर भागातून ताब्यात घेतले. सुरवातीला पोलिसांना त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, त्याला पोलिसी खाक्या दाखविताच अखेर त्याने अनैतिक संबंधातून भांडणे झाल्यानंतर आपणच संगीता शिंदेचा गळा दाबून खून केल्याची स्पष्ट कबुली दिली. आरोपी इम्रानखान हा वाहनचालक म्हणून काम करत असून त्याला एक मुलगी आहे. काही दिवसांपूर्वी पत्नीसोबत त्याचा वाद झाल्यामुळे मुलीला सोबत घेऊन त्याची पत्नी माहेरी निघून गेली आहे. 

Tags : Aurangabad, woman, murder,  immoral bondage