Fri, Jul 19, 2019 05:26होमपेज › Aurangabad › मुख्य रस्त्यांवरील दहा हजार पथदिवे एलईडीने उजळणार

मुख्य रस्त्यांवरील दहा हजार पथदिवे एलईडीने उजळणार

Published On: Jan 12 2018 1:51AM | Last Updated: Jan 12 2018 1:41AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

एलईडीच्या प्रकल्पाअंतर्गत शहरातील एकूण 40 हजार पथदिवे बदलले जाणार आहेत. या कामाची सुरुवात नुकतीच झाली आहे. पहिल्या टप्प्यात मुख्य रस्त्यांवरील 10 हजार पथदिवे बदलले जातील, अशी माहिती शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी गुरुवारी मनपा स्थायी समितीच्या बैठकीत दिली. दरम्यान, एलईडीच्या प्रकल्पाला पूर्णपणे सुरुवात होईपर्यंत आगामी तीन महिन्यांसाठी शहरातील पथदिव्यांची देखभाल दुरुस्ती करणार्‍या 22 ठेकेदारांना मुदतवाढ दिली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मनपा स्थायी समितीच्या बैठकीत गुरुवारी नगरसेवकांनी पथदिव्यांची दुरुस्ती होत नसल्याची तक्रार केली. शहरातील बहुतांश पथदिवे बंद आहेत. दुरुस्तीची कामे होईनात. प्रशासनाचे घोडे नेमके कोठे अडले आहे, असा सवाल नगरसेवक राज वानखेडे यांनी उपस्थित केला. यावर खुलासा करताना विद्युत विभागाचे उपअभियंता के. डी. देशमुख यांनी दुरुस्तीच्या कामांची मुदत 31 डिसेंबरला संपली असल्याचे सांगत नवीन निविदा प्रक्रिया कार्यवाहीअंतर्गत असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर वानखेडे यांनी विद्युत विभागाच्या दिरंगाईवर ताशेरे ओढले. मुदत संपून दहा दिवस झाले.

आता मुदतवाढ दिल्यानंतर दरम्यानच्या काळातील बिलेही काढली जातील. यात अधिकारी आणि कंत्राटदारांमध्ये साटेलोटे असल्याचा आरोपही वानखेडे यांनी केला. तर राजू वैद्य यांनी सहा-सहा महिने पथदिव्यांच्या दुरुस्तीच्या संचिका दाबून ठेवल्या जात असल्याचा आरोप केला. यावर देशमुख यांनी एलईडी प्रकल्पातून ती कामे होणार असल्याचे सांगितले. यावर नगरसेवकांनी तीव्र आक्षेप घेतला.

शेवटी शहर अभियंता पानझडे यांनी खुलासा केला की, पथदिव्यांच्या दुरुस्तीच्या संदर्भात विद्युत विभागाची बैठक घेऊन मी समज दिली होती. मात्र, झाले ते झाले. तूर्तास दुरुस्तीच्या कामांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिली जाईल. एलईडीच्या कामांना लवकरच सुरुवात होईल. पहिल्या टप्प्यात 10 हजार एलईडीचे दिवे संबंधित कंत्राटदाराकडून बसविले जाणार आहेत. त्यांच्या दुरुस्तीचे कामही त्याच्याकडेच राहील. अशा प्रकारे एकूण चार टप्प्यांत 40 हजार एलईडी दिवे शहरात लावले जाणार आहेत, त्यांची दुरुस्तीची कामेही संबंधित कंत्राटदाराकडून केली जातील. पहिल्या दहा हजार दिव्यांच्या दुरुस्तीची कामेही एलईडी कंत्राटदाराकडून विनाशुल्क करून घेतली जाणार आहेत. या संदर्भात पालिकेच्या 22 कंत्राटदारांची बैठक घेऊन त्यांना सूचना करणार असल्याचेही पानझडे यांनी स्पष्ट केले.