Sun, May 26, 2019 10:41होमपेज › Aurangabad › देशातील शस्त्र निर्मितीचे दहा कारखाने पोलिसांच्या रडारवर

देशातील शस्त्र निर्मितीचे दहा कारखाने पोलिसांच्या रडारवर

Published On: Jul 03 2018 1:50AM | Last Updated: Jul 03 2018 12:18AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

‘फ्लिपकार्ट’वरून ऑनलाइन शस्त्र खरेदी प्रकरणाचा तपास संथगतीने सुरू असला तरी यात निश्‍चित दोषींवर कायदेशीर कारवाई होईल, असे स्पष्ट करून देशातील शस्त्र निर्मितीचे आठ ते दहा कारखाने रडारवर आहेत. त्यांना नोटीस पाठविण्यात आल्या असून दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर हा गुन्हा अतिशय गांभीर्याने हाताळला जात असल्याचे पोलिस आयुक्‍त चिरंजीव प्रसाद यांनी सांगितले. सोमवारी ते पत्रकारांशी बोलत होते.

फ्लिपकार्टवरून अनेकांनी तलवार, जंबिया, गुप्ती, दुधारी चाकू अशी धारदार शस्त्रे मागविल्याची माहिती मिळाल्यावरून गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्यासह पथकांनी 28 मे रोजी इन्स्टाकार्ट कुरियरच्या नागेश्‍वरवाडी आणि जयभवानीनगर येथील कार्यालयात छापा मारला होता. तेथून पहिल्या दिवशी 31 आणि दुसर्‍या दिवशी 7 शस्त्रे जप्त करण्यात आली होती. गुन्हे शाखेच्या एका पथकाने भिवंडी येथूनही काही शस्त्रे जप्त केली होती. या गुन्ह्यात इन्स्टाकार्ट आणि फ्लिपकार्टच्या अधिकार्‍यांनाही आरोपी करण्यात आले आहे. 

दरम्यान, त्यांना अटकपूर्व जामीन मिळाला असून इन्स्टाकार्टच्या अधिकार्‍यांना हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणी, अधिक माहिती देताना पोलिस आयुक्‍तांनी सांगितले की, दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर शहरात अशी शस्त्रे खरेदी करणे गंभीर असून पोलिस सर्वांवर लक्ष ठेवून आहेत. कोणीही अशी शस्त्रे विकणे आणि लोकांनी ती खरेदी करणे गैरकायदेशीर आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.