Tue, May 21, 2019 12:29होमपेज › Aurangabad › तंत्रज्ञानाद्वारे आव्हानांचा मुकाबला शक्य

तंत्रज्ञानाद्वारे आव्हानांचा मुकाबला शक्य

Published On: May 16 2018 1:39AM | Last Updated: May 16 2018 1:10AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

देशासमोर शैक्षणिक गुणवत्तेतील पिछाडी, बेरोजगारी आणि शहरी-ग्रामीण विषमता ही तीन मोठी आव्हाने आहेत. तथापि, शिक्षण संरचनेत बदल आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण यावर मात करून झेप घेऊ शकतो, असा विश्‍वास ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी मंगळवारी (दि. 15) येथे व्यक्‍त केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 58 व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. 

विद्यापीठ नाट्यगृहात मंगळवारी सायंकाळी चार वाजता हा समारंभ उत्साहात सुरू झाला. यावेळी मंचावर डॉ. काकोडकर यांच्यासह कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, कुलसचिव डॉ. साधना पांडे, व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे, परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. दिगंबर नेटके, अधिष्ठाता डॉ. मजहर फारुकी, डॉ. वाल्मिक सरवदे, डॉ. संजय साळुंके, उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. सतीश देशपांडे व तंत्र शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. महेश शिवणकर यांची उपस्थिती होती. देशासमोरील आव्हाने, शिक्षणाची स्थिती आणि मार्ग याबाबत काकोडकर यांनी भाष्य केले. देशात सध्या 3.4 कोटी विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत. 

मात्र, गुणवत्तेच्या आघाडीवर प्रचंड बोंब आहे. इंडियन स्किल्स रिपोर्ट-2017 नुसार फक्‍त 40 टक्के विद्यार्थी रोजगारासाठी पात्र आहेत. 25 कोटी विद्यार्थ्यांसमोर रोजगाराचा प्रश्‍न आहे.रोजगारांच्या संधी आणि उमेदवार यातील दरी वाढत चालली आहे. ती नेहमीप्रमाणे व्यवसायाच्या माध्यमातून भरून काढणे शक्य नाही. सुदैवाने तंत्रज्ञानाद्वारे आपण या दोन्ही आव्हानांचा सामना करू शकतो, असा विश्‍वास काकोडकर यांनी व्यक्‍त केला. चांगले विद्यार्थी घडविण्यासाठी उच्च शिक्षण संरचनेत बदलाची गरज आहे असेही ते म्हणाले. विद्यापीठाच्या वाटचालीवर कुलगुरू चोपडे यांनी प्रकाश टाकला. ‘एनआयआरएफ’ मानांकनात राज्यात 12 विद्यापीठांत ‘बामू’ने दुसरा क्रमांक मिळवला. आगामी ‘नॅक’ मानांकनात उत्तम कामगिरी करण्यात यश मिळेल, असे चोपडे म्हणाले.