Thu, Mar 21, 2019 11:44होमपेज › Aurangabad › शिक्षक, कर्मचार्‍यांचे वेतन वादामुळे रखडले

शिक्षक, कर्मचार्‍यांचे वेतन वादामुळे रखडले

Published On: Jul 02 2018 1:42AM | Last Updated: Jul 02 2018 12:45AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

समाजकल्याण विभाग आणि विद्यापीठाच्या वादात सामाजिक कार्य महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे वेतन रखडले आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्य हेमलता कुलकर्णी सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यामुळे त्यांनी पाठविलेले वेतन देयक स्वीकारता येणार नाही, असा पवित्रा समाजकल्याणने घेतला असून कुलगुरू अथवा कुलसचिवांच्या स्वाक्षरीने सुधारित वेतन देयक सादर करावे, असे विद्यापीठाला कळविले आहे.

कुलगुरुंना पाठविलेल्या पत्रात सहायक समाजकल्याण आयुक्‍तांनी म्हटले आहे की, प्राचार्य कुलकर्णी डिसेंबर 2017 मध्ये निवृत्त झाल्यामुळे सेवार्थ प्रणालीतून त्यांचे नाव वगळण्यात आले आहे. ही बाब विद्यापीठाला कळविलेली आहे. महाविद्यालय विद्यापीठाकडे हस्तांतरित करण्याबाबतच्या शासन निर्णयातही महाविद्यालयाला सामाजिक न्याय विभागाचे शासन निर्णय लागू राहतील, असे स्पष्ट म्हटलेले आहे. त्यामुळे कुलकर्णी यांच्या जानेवारीपासूनच्या वेतनाची जबाबदारी या कार्यालयाकडे नाही. विद्यापीठ प्रशासनाने त्यांना सेवामुक्‍त करायला हवे. कुलकर्णी यांना प्राचार्य म्हणून पत्रव्यवहार करण्याचा अधिकार नाही. असे असताना त्या प्राचार्य म्हणून पत्रव्यवहार करीत आहेत. विद्यापीठाने एक तर त्यांच्या मुदतवाढीबाबत सामाजिक न्याय विभागाचा शासन निर्णय असेल तर तो सादर करावा किंवा त्यांना सेवामुक्‍त करावे.