बीड : प्रतिनिधी
जुनी पेन्शन योजना सरकारने बंद केली आहे, ही योजना पुन्हा सुरू करावी यासाठी शिक्षक परिषदेकडून सातत्याने आंदोलन केले जात आहे. शनिवारीही या मागणीसह सातवा वेतन आयोग लागू करावा, शिक्षकांचे राहिलेले वेतन देण्यात यावे या मागणीसाठी शिक्षक परिषदेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
सरकारने जुनी पेन्शन योजना बंद केली आहे. ही योजना शिक्षकांसाठी महत्त्वाची होती. त्यामुळे ही पेन्शन योजना पुन्हा सुरू करावी या मागणीसाठी शिक्षक परिषदेच्या वतीने सातत्याने आंदोलने करण्यात येत आहेत. याच मागणीसाठी पुन्हा शिक्षकांनी शनिवारी धरणे आंदोलन केले. या मागणीसह शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करावा ही मागणीही करण्यात आली. केंद्र शासनाने सातवा वेतन आयोग लागू केला आहे, मग राज्य सरकार शिक्षकांवर का अन्याय करीत आहे? असा प्रश्नही यावेळी शिक्षकांनी केला. या आंदोलनामध्ये जिल्हाध्यक्ष विकास गवते, बाळकृष्ण थापडे, नंदकिशोर झरीकर, प्रा. बाळासाहेब साळवे, महादेव चाटे, दिलीप मोराळे यांच्यासह इतर शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.