Fri, Nov 16, 2018 17:08



होमपेज › Aurangabad › तूरडाळीच्या पाकिटांची गोदामात थप्पी

तूरडाळीच्या पाकिटांची गोदामात थप्पी

Published On: Mar 15 2018 1:55AM | Last Updated: Mar 15 2018 1:51AM



औरंगाबाद : रवी माताडे

रेशनदुकानांमार्फत कार्डधारकांना वाटपासाठी आलेली शेकडो क्‍विंटल तूरडाळ सरकारी गोदामात पडून आहे. एक किलोच्या पाकिटातील तूरडाळीच्या गोण्या गोदामात आणून टाकलेल्या असून, महिनाभरापासून ही तूरडाळ गोदामात पडली आहे. ही डाळ कार्डधारकांच्या नावाखाली व्यापार्‍यांना विक्री करण्यासाठी ठेवली आहे का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

दोन वर्षांपूर्वी दिवाळीपूर्वी तूरडाळीचा प्रश्‍न मोठा गंभीर बनला होता. व्यापार्‍यांनी नफेखोरी केल्याने तूरडाळीचा भाव प्रतिकिलो 150-180 रुपयांपर्यंत गेला होता. ही परिस्थिती पाहता, शासनाने सर्वसामान्यांना अत्यल्प दरात रेशनदुकानांमार्फत तूरडाळ विक्रीसाठी उपलब्ध करून दिली होती. शासनाच्या या उपाययोजनेमुळे खुल्या बाजारात तूरडाळीचा भाव घसरला होता. त्यानंतर ऑक्टोबर 2017 मध्येही शासनाने 55 रुपये किलोदराने तूरडाळ उपलब्ध करून दिली होती. एक किलो पाकीटबंद तूरडाळ रेशनदुकानांमार्फत कार्डधारकांना देण्यात आली होती.

ही डाळ वाटप झाल्यानंतर डिसेंबर 2017 मध्येही औरंगाबाद शहरासाठी 150-200 क्‍विंटल तूरडाळ आली होती. तर फेब्रुवारी 2018 मध्ये सुमारे 1200 क्‍विंटल तूरडाळ आलेली आहे. मार्च महिन्यातही रेशनदुकानांपर्यंत ही डाळ पोहोचवण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे महिन्याच्या पहिल्या व दुसर्‍या आठवड्यातच रेशनदुकानांवर धान्य खरेदीसाठी कार्डधारकांची गर्दी होत असते. एकदा धान्य घेऊन गेल्यानंतर कार्डधारक थेट पुढील महिन्यात दुकानावर येतो. मार्च महिन्यातील 15 दिवसांत जवळपास रेशनदुकानांवर धान्य वाटपाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. गोदामात ठेवलेली तूरडाळ जर कार्डधारकांसाठी आहे, तर ती रेशनदुकानांपर्यंत का पोहोचवण्यात आलेली नाही, असा प्रश्‍न उपस्थित केला 
जात आहे. 

शासनाने शेतकर्‍यांकडून तूर खरेदी केली होती. या तुरीवर प्रक्रिया करून तूरडाळ तयार केली व ही डाळ एक किलोच्या पाकिटांमध्ये रेशनदुकानांमार्फत सर्व कार्डधारकांना विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहे. मागील महिन्यातच ही डाळ शासनाकडून आली असून कार्डधारकांना 55 रुपये किलो दराने वाटपही सुरू झाले आहे. आपल्याला मिळालेला पहिला लॉट संपला असून, आता दुसरा लॉट आलेला आहे. मार्च महिन्यापासून तो वाटपही करण्यात येत आहे. - डॉ. भारत कदम, जिल्हा पुरवठा अधिकारी.

सध्या खुल्या बाजारात एक किलो तूरडाळीसाठी 65-80 रुपये मोजावे लागत आहे. तर शासनाची तूरडाळ 55 रुपये किलो नागरिकांना मिळणार आहे. कार्डधारकांच्या संख्येनुसार रेशनदुकानदारांना ही डाळ विक्रीसाठी दिली जात आहे. या डाळीचा दर्जाही उत्तम असल्याने, शासनाकडून 55 रुपयांना घ्यायची व व्यापार्‍यांना 60-70 रुपयांना विकण्याची दुकानदारीही रेशनदुकानदारांकडून होण्याची शक्यता आहे.