Tue, Nov 19, 2019 11:42होमपेज › Aurangabad › तलाठी सज्जा कार्यालयांचा कारभार चालतो शहरातून

तलाठी सज्जा कार्यालयांचा कारभार चालतो शहरातून

Published On: Dec 14 2017 2:39AM | Last Updated: Dec 14 2017 2:32AM

बुकमार्क करा

वैजापूर : विजय गायकवाड

वैजापूर शहराजवळअसलेल्या जवळपास 20 गावांतील तलाठी सज्जा कार्यालयांचा कारभार गेल्या अनेक वर्षांपासून शहरातून सुरू आहे. या गावांचा कारभार शहरातून सुरू असल्याने अप्पा मंडळी गावाकडे फिरकतच नाही. महसूल अधिकार्‍यांचा अप्पामंडळीवर वरदहस्त असल्याने ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून अशीच अव्याहतपणे सुरू आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांना किरकोळ कामासाठी शहरातील उंबरठे झिजवावे लागत आहेत. विशेष म्हणजे सजांचा कारभार पाहण्यासाठी अप्पा मंडळीनी झीरो तलाठ्यांची नियुक्ती केली आहे. 

वैजापूर शहरानजीक तालुक्यातील आघूर, जरूळ, घायगाव, नांदगाव, बिलोणी, जांबरगाव व भिवगाव आदी सजांची गावे आहेत. या सज्जांमध्ये लोणी बु., पानगव्हाण, भायगाव, रोटेगाव, सटाणा, चांडगाव, लाख पानव, पानवी खंडाळा, नारळा, तिडी, मकरमतपुरवाडी व संवदगाव आदी गावांचा समावेश होतो. तलाठी म्हटले की नागरिकांसह विद्यार्थ्यांना रहिवासी प्रमाणपत्रापासून ते जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलीयर, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, सातबारा व आठ अ चे उतार्‍यांंचे काम पडते. या गावांशी संबंधित असलेले सर्वच तलाठी सज्जा कार्यालये हे तलाठ्यांनी वैजापूर शहरात थाटले आहे. यापुढचा कहर म्हणजे यातील अपवाद वगळता बहुतांश अप्पामंडळी जिल्ह्याच्या ठिकाणी राहून ही सर्कस चालवितात. त्यामुळे लहान सहान कामांसाठी शहरानजीक असलेल्या गावातील नागरिक व विद्यार्थ्यांना वैजापूर शहराच्या ठिकाणी हेलपाटे मारावे लागतात. 

यातही अप्पा अथवा त्यांचे नियुक्त केलेले झीरो तलाठी सापडतीलच याची शाश्वती नाही. अप्पा मंडळी त्यांच्या सज्जा अंतर्गंत गावात एखादा प्रशासकीय कार्यक्रम असेल तरच चेहरा दाखवितात. याशिवाय ते गावाकडे फिरकतच नाही. मंडळाधिकारी, तलाठी व झीरो तलाठी हे तिघेही शहरातील एकाच छताखाली असतात. या तलाठ्यांनी त्यांच्या सजानुसार गावांच्या दिशेने जाणार्‍या रस्त्यावर गाळे घेऊन सज्जा कार्यालये थाटली आहेत, परंतु सज्जेच्या गावात जाऊन कार्यालय सुरू करण्यासाठी कोणीच धजावत नाही.

शिवाय कोणत्याही महसूल अधिकार्‍यांनी या अप्पामंडळीना सज्जा कार्यालयालय गावाच्या ठिकाणी असायला हवे, अशी सक्ती अथवा फर्मान सोडले नाही. अप्पामंडळीना त्यांच्या सोयीनुसार काम उरकून औरंगाबाद गाठायचे असल्याने शहराच्या ठिकाणी सज्जा कार्यालये थाटली आहेत. दरम्यान उंटावरून शेळ्या हाकणार्‍या अप्पांच्या या कारभारामुळे जनता त्रस्त झाली आहे. दस्तूरखुद्द तहसीलदार सुमन मोरे यांनीही या वृत्तास दुजोरा देऊन याबाबत खंत व्यक्त केली.