Thu, May 28, 2020 10:25होमपेज › Aurangabad › तीन महिन्यांत अपील निकाली काढा

तीन महिन्यांत अपील निकाली काढा

Published On: Apr 10 2018 1:21AM | Last Updated: Apr 10 2018 1:12AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

गेल्या दहा वर्षांपासून औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेतील वाद सुरू आहे. धर्मदाय सहआयुक्तांकडे प्रलंबित असलेले दोन अपील तीन महिन्यांत निकाली काढण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. व्ही. के. जाधव यांनी दिले आहेत. दरम्यान, हे अपील प्रलंबित असेपर्यंत औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेची निवडणूक घेता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश देखील खंडपीठाने दिले आहेत.  

औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेची 2008 मध्ये निवडणूक झाली होती. त्यावेळी मतदार यादीत नवीन 48 सभासदांची नोंदणी करण्यात आली होती. याला आक्षेप घेत सचिन मुळे यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका केली होती. या याचिकेत 48 नवीन सभासद आणि जुने सभासद यांच्या मतदानाच्या पेट्या वेगळ्या ठेवण्याचे निर्देश न्या. भूषण गवई यांनी 24 जून 2009 रोजी दिले होते. त्यानुसार निवडणूक घेण्यात आली. तब्बल वर्षभरानंतर मतमोजणी झाल्यावर औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी राम भोगले, सचिवपदी सचिन मुळे, सहसचिवपदी शिरीष बोराळकर हे निवडून आले होते. सचिन मुळे यांनी धर्मादाय आयुक्तांकडे चेंज रिपोर्ट सादर केला होता. नवीन 48 सभासदांच्या विरोधात मोहन बोंबले यांनी आक्षेप घेतला होता. या दोन्ही अर्जांचा निकाल 31 ऑगस्ट 2016 रोजी लागला. त्यात 48 सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच संघटनेचे सचिन मुळे, आजीव सभासद सुहास कुलकर्णी, मोहन बोरा, वसंत शर्मा यांचेही सभासदत्व रद्द करण्यात आले होते. या आदेशाविरोधात 48 नवीन सभासदांनी आणि या चार सदस्यांनी अपील दाखल केले होते. 

दरम्यान, 1988 च्या कार्यकारिणीला निवडणूक घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार संघटनेचे तत्कालीन सहसचिव किरण जोशी यांनी निवडणूक जाहीर केली होती. या निवडणुकीला धर्मादाय उपायुक्तांनीच स्थगिती दिली. त्यानंतर दोन वेळा किरण जोशी यांनी निवडणूक जाहीर केली. 11 मार्च 2017 रोजी निवडणूक घोषित करण्यात आली. या निवडणूक घोषणेच्या विरोधात आजीव सभासद विशाल पांडे यांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले. खंडपीठाने निवडणूक पुढील आदेशापर्यंत घेऊ नये असा अंतरिम आदेश दिला. हा आदेश न्या. जाधव यांनीही कायम ठेवला आहे. 

Tags : Aurangabad, out, appeal,  three, months