औरंगाबाद : विशेष प्रतिनिधी
इलेक्ट्रिक वाहनांची मोफत चाचणी घेण्याची संधी शहरवासीयांना शुक्रवारी (दि.16) पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर मिळणार आहे. निमित्त आहे ‘सीएआयए’च्या ई-व्हेईकल परिषदेचे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनादेखील ई-रिक्षाची सैर घडविण्यात येणार आहे.
प्रदूषणविरहित विद्युत ऊर्जेवर चालणार्या वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने ‘सीएमआयए’तर्फे पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयात सकाळी नऊ ते पाच या वेळेत ई-व्हेईकल कार्यशाळा घेतली जाणार आहे.
र्हीमन मोटर्सचे संस्थापक डॉ. ऋषण चहेल, मुंबई आयआयटीचे प्रा. किशोर मुन्शी, ईसी मोबिलिटीच्या सीईओ मिताली मिश्रा यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगमंत्री देसाई हे दुपारी तीन वाजता मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती ‘सीएमआयए’चे अध्यक्ष प्रसाद कोकीळ यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. प्राचार्य डॉ. अभिजित वाडेकर, परिषदेचे संयोजक राहुल देशपांडे, सुरेश तोडकर, प्रा. अमित पाईकराव या वेळी उपस्थित होते.
परिषदेनिमित्त पीईएस महाविद्यालयाच्या मैदानावर प्रत्येकी दोन ई-दुचाकी, रिक्षा आणि कार टेस्टराईडसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ई-रिक्षांबाबत नागरिकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. ते दूर करण्यासाठी उद्योगमंत्र्यांना ई-रिक्षाची सैर घडवली जाईल, असे कोकीळ यांनी सांगितले.