Sat, Jul 20, 2019 10:49होमपेज › Aurangabad › शाळा परिसरातील तंबाखू विक्रीवर कारवाई करा

शाळा परिसरातील तंबाखू विक्रीवर कारवाई करा

Published On: Jan 29 2018 1:42AM | Last Updated: Jan 29 2018 1:17AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

सर्व शाळांचा परिसर तंबाखूमुक्त करण्याचे आदेश गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिले असून पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांना तत्काळ करवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. 24 जानेवारी रोजी दै. ‘पुढारी’ने ‘शाळा परिसरात तंबाखूची सर्रास विक्री’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. यानंतर पाटील यांनी मंत्रालयात अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या आयुक्तांसह वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेतली. त्यानंतर हे आदेश दिले आहेत.

शाळेच्या 100 यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर शासनाने बंदी घातलेली आहे. जर अशी विक्री करताना पकडले तर सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा 2003 च्या कलम 4, 5, 6 चे उल्लंघन करणार्‍याविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार संबंधित प्रमुखांना आहेत. 18 वर्षांखालील व्यक्तींना तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास व शैक्षणिक संस्थेच्या 100 यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणार्‍यास 200 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. तसेच परत-परत नियम मोडणार्‍याला दोन वर्षांपर्यंत शिक्षाही होऊ शकते; पण हा नियम केवळ कागदावर असून शहरातील विविध शाळांच्या मुख्य गेटसमोर, भिंतीलगत खुलेआम तंबाखू, सिगारेटची विक्री सुरू आहे. दै. ‘पुढारी’ने केलेल्या रिअ‍ॅलिटी चेकमध्ये हा गंभीर प्रकार आढळून आला. 

विशेष म्हणजे याकडे ना अन्न व औषधी प्रशासनाचे लक्ष आहे, ना जिल्हाधिकार्‍यांनी कारवाईसाठी नेमलेल्या पथकाचे. दरम्यान, हा प्रकार दै. ‘पुढारी’ने समोर आणल्यानंतर गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी त्याची गंभीर दखल घेतली. अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यांसह पोलिस विभागाच्या अधिकार्‍यांना कारवाईचे निर्देश दिले आहेत. औरंगाबादेत पानटपर्‍या सर्रास सुरू असल्याचे प्रकर्षाने समोर आल्याने पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांना तत्काळ कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. 

जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांचे दुर्लक्ष

तंबाखू नियंत्रण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकार्‍यांनी पथक स्थापन केले आहे. या पथकाची ऑक्टोबर 2017 मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली होती. त्यात पथकाचे प्रमुख जिल्हा पुरवठा अधिकारी यांना कारवाई करण्याचे जिल्हाधिकार्‍यांनी आदेशही दिले होते; परंतु त्यांचे शहरात दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे.