होमपेज › Aurangabad › तहसीलदारांनी बजावली दोन अभियंत्यांना नोटीस

तहसीलदारांनी बजावली दोन अभियंत्यांना नोटीस

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सिल्‍लोड : प्रतिनिधी

सिल्‍लोड तालुक्याला आगामी काळात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असून, यामुळे तालुक्यात असणार्‍या धरणातील उपलब्ध पाणीसाठा राखीव ठेवण्यासाठी तालुका प्रशासनाने कंबर कसली आहे. अवैध पाणी उपसा करणार्‍यांवर थेट कारवाई करण्याचा  इशारा अधिकार्‍यांनी दिला आहे. दरम्यान, गेवराई शे. तलावातील पाणी उपसा रोखण्यासाठी तहसीलदार संतोष गोरड यांनी लघुपाटबंधारे उपअभियंता सय्यद साजीद, लघुसिंचनचे शाखा अभियंता ए.आर.बढे यांना कळविले होते. मात्र या दोघानींही याप्रकरणी चालढकलपणा केल्याने त्यांना कलम 107  नुसार फौजदारी कारवाईची नोटीस बजावली आहे.

यावर्षी सिल्‍लोड तालुक्यासह परिसरात पुरेसा पाऊस न झाल्याने तालुक्यातील अनेक धरणांची पाणी पातळी खालावली आहे. या धरणात पुरेसा पाणीसाठा नसल्याने ती तहानलेलीच आहेत. ज्या धरणात मुबलक पाणीसाठा आहे त्यांच्यासह तलावातून रात्रंदिवस अवैध पाणी उपसा सुरू असल्याने भीषण पाणीटंचाईचे संकट उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकाराला रोक लावण्यासाठी अनेक गावातून तहसील कार्यालयात निवेदने देण्यात आली होती. याची दखल घेत तहसीलदारांनी पाणी उपसा करणार्‍यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथके तयार केली असून धडक कारवाई करत वीज पंप, डिझेल पंप जप्‍त करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. 

धरणक्षेत्रातील विद्युत पुरवठा खंडित करणार 

दरम्यान, तालुक्यात आगामी काही महिन्यांत भीषण पाणीटंचाई उद्भवणार आहे. त्यामुळे केळगाव व चारनेेर धरणातील पाणीसाठा  राखीव ठेवण्याची  मागणी तहसीलदारांनी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे केली आहे. दरम्यान, धरणालगतचा विद्युत पुरवठा बंद करण्यात येणार असून याबाबतही त्यांची परवानगी देखील घेण्यात येणार आहे.